झेंडूच्या फुलांनी खाल्ला 'भाव' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

पुणे : रोजच्या तुलनेत आवक घटल्याने शनिवारी कलकत्ता झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत झेंडू यंदा चांगला भाव खात आहे. त्याच वेळी शेवंतीचा 'भाग्यश्री' हा नवीन वाण बाजारात दाखल झाला आहे. 

पुणे : रोजच्या तुलनेत आवक घटल्याने शनिवारी कलकत्ता झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत झेंडू यंदा चांगला भाव खात आहे. त्याच वेळी शेवंतीचा 'भाग्यश्री' हा नवीन वाण बाजारात दाखल झाला आहे. 

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी एक दिवस बाजारात चांगली आवक होते. गेले दोन दिवस चांगली आवक झाली, परंतु शनिवारी तरकारी, कांदा बटाटा विभाग बंद असल्याचा परिणाम फुलांच्या आवकेवर झाला. या तरकारीच्या गाड्यांमधूनही फुलांची आवक होत असते. साप्ताहिक सुटी असल्याने शनिवारी शेतीमालाची वाहतूक बंद होती. त्यामुळे फुलांची आवकही कमी झाल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. 

आवक पन्नास टक्‍क्‍यांनी घटल्यामुळे झेंडूच्या 'कलकत्ता' या वाणाला प्रति किलोला शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. इतर झेंडूला साधारणपणे 80 ते 100 रुपये इतका भाव मिळाला. कलकत्ता झेंडू आकाराने लहान आणि दिसण्यास सुंदर असल्याने त्याचा हार करण्यासाठी वापर केला जातो. गणेशोत्सवात हारासाठी फुलांची मागणी वाढते असेही त्यांनी नमूद केले. 

झेंडूपाठोपाठ शेवंती, गुलछडी, ऍस्टर या फुलांना मागणी असून, त्यांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेवंती या फुलाचे 'गोल्डन', 'रतलम', 'राजा' असे वाण येत असतात. गेल्या वर्षी 'पौर्णिमा' हा वाण बाजारात आला होता, तर यंदा 'भाग्यश्री' हा वाण बाजारात आला आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली. 

हार, पूजेसाठी आवश्‍यक फुलांना मागणी असून, सजावटीसाठी फुलांच्या मागणीत वाढ झाल्याचे व्यापारी अरुण वीर यांनी नमूद केले. ''गौरी आगमनाच्या कालावधीत पुन्हा फुलांची आवक वाढेल. गौरीसाठी फूल उत्पादकांनी माल राखून ठेवला आहे. त्यामुळे तेव्हा मालाची आवक चांगली होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव कमी आहेत. गेल्या वर्षी झेंडूचे उत्पादन चांगले झाले होते. त्यामुळे झेंडूची आवक जास्त झाल्याने भाव कमी मिळाले होते. तुलनेत यंदा फूल उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. गेल्या वर्षी प्रति किलोचा भाव 60 ते 80 रुपये प्रतिकिलो इतका होता. या वर्षी त्यामध्ये 30 टक्‍के वाढ झाली आहे.''