जुन्नरला ग्रामपंचायत निवडणुकीत गोंधळाचे वातावरण

जुन्नरला ग्रामपंचायत निवडणुकीत गोंधळाचे वातावरण

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा सुरू असलेला कार्यक्रम चर्चेचा विषय होत चालला आहे. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभाराची चर्चा रंगत आहे. खामगाव ग्रामपंचायतीच्या उमेदवाराचा अर्ज वैध की अवैध या कारणावरून झालेला वाद मिटतो ना मिटतो तोच सांगणोरे ग्रामपंचायतीच्या अपात्र असणाऱ्या उमेदवारालाच चिन्ह वाटप करण्याचा प्रताप निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केला.

यामुळे उमेदवार व निवडणूक अधिकारी यांच्यात वाद होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यात निवडणूक अधिकारी गाडेकर याना दवाखान्यात हलवावे लागले. निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी पुरेसा पोलीस बंदबोस्त उपलब्ध नसल्याने निवडणुकीच्या कामात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आली असल्याचे  निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निवडणुक आयोगाकडे पोलीस बंदोबस्त नसल्याची तक्रार केल्याचे समजते.

यानंतर दोन पोलीस कर्मचारी येथे आले असल्याचे सांगण्यात आले. एकूण या सर्व प्रकारांमुळे जुन्नरला निवडणूक विभागाच्या काम काजाचा बोजवारा उडाला असल्याची खंत उमेदवारांकडून व्यक्त केली जात होती.

तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींचा गुरुवार दि १४ रोजी उमेदवारांचा अर्ज माघारीचा व चिन्ह वाटपाचा दिवस होता. यामुळे तहसील परिसरात मोठी गर्दी होती. दुपारी 3 वाजेपर्यंत एकही पोलीस कर्मचारी येथे नव्हता. पोलीस बंदोबस्ताची मागणी एक महिन्यांपूर्वी लेखी पत्राने केली असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या दरम्यान सुरु असलेल्या या प्रकरणामुळे उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक विभागाच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात  येत आहे. निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण व अनुभव नसल्याने त्यांना ठोस निर्णय घेता येत नसल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

निवडणुकीबाबत काही शंका,माहिती विचारण्यास गेलेल्या उमेदवारांना तहसील कार्यालयाचे कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने शंका कोणाला विचाराव्यात असा प्रश्न उमेदवारांकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com