ते तरुण माझ्यासाठी देवदूतच... 

डी. के. वळसे पाटील
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मंचर : 'खडकाला पाण्याने वेढा दिला होता. दिवस मावळतीकडे जसा झुकत होता. तसा अंगाचा थरकाप चालला होता. मरण डोळ्यासमोर दिसत होते. दोन जणांनी माझा हात पकडून पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्यामुळे वाचले. ते तरुण म्हणजेच माझ्या दृष्टीने देवदूतच होते.'' असे घोड नदीच्या पुराच्या पाण्यातून वाचलेल्या शशिकला डोके या ज्येष्ठ महिलेने सांगितले. 

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुराच्या पात्रात खडकावर शुक्रवारी (ता. 25) शशिकला अडकल्या होत्या. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. 

शशिकला म्हणाल्या, ''नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेले होते. काही कपडे धुतल्यानंतर नदीचे पाणी वाढल्याचे लक्षात आले. खडकाला पाण्याने वेढा घातला होता. पुराच्या पाण्यातून बाहेर पडणे शक्‍य नव्हते. नदी काठावर असलेला मुलगा प्रकाश डोके दिसला. त्याच्यासह इतर लोक मला खडकाला चिटकून राहा असे वारंवार सांगत होते. मी खडकाला घट्ट पकडून ठेवले होते. जोरदार पाण्याच्या लाटेबरोबर सर्व कपडे वाहून गेली. अंधार पडू लागला. गळ्यापर्यंत पाणी आले. मुलगा व नातवंडे डोळ्यासमोर आली. आता आपली जीवन यात्रा संपणार असे वाटू लागल्याने डोळे बंद करून देवाचा धावा सुरू केला. तेवढ्यात कुणीतरी माझे हात पकडून 'आजीबाई घाबरू नका,' असा आवाज कानावर पडला. अंधारात मला दोन तीन जण ओढत घेऊन घोडनदीच्या किनाऱ्यावर आले. मला वाचविलेल्या तरुणांना विघ्न्हर्त्याने मोठ आयुष्य द्यावं, ही माझी प्रार्थना.'' 

शशिकला यांना वाचविल्याबद्दल किशोर टेके, धनंजय कोकणे, चंद्रकांत काळे, अजीज काझी, योगेश पिंगळे, आशिष डोके यांचा सत्कार मंचर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या हस्ते करण्यात आला.