अंनिसतर्फे 18 डिसेंबरला नागपूरला 'जवाब दो' धरणे 

अंनिसतर्फे 18 डिसेंबरला नागपूरला 'जवाब दो' धरणे 

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 52 महिने पूर्ण होत आहेत. अद्याप मारेकरी फरार असून, त्यांना पकडण्यात सरकार उदासीन असल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्याचा निषेध आणि संताप व्यक्त करण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे 18 डिसेंबरला 'जवाब दो' धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील फरार आरोपींना वेळीच अटक झाली असती तर कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या टाळता आली असती. मात्र डॉ. दाभोलकर यांची हत्या करणाऱ्यांना पकडण्यात सरकार दिरंगाई करत आहे. याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि आमदार, खासदार यांना समितीच्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटून जाब विचारणार आहेत. संसद आणि विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी हा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करून त्याची चर्चा करावी, अशी मागणीदेखील समितीतर्फे स्थानिक प्रतिनिधींकडे करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

या वेळी समितीचे राज्य उपाध्यक्ष अशोक धिवरे, पुणे शाखा कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी आदी उपस्थित होते. 

समितीतर्फे 20 जुलै ते 20 ऑगस्टदरम्यान 'जवाब दो' आंदोलन राज्यात आणि देशात राबविण्यात आले होते. या आंदोलनाला देशभरातून जवळपास एक कोटी नागरिकांनी विविध माध्यमातून पाठिंबा दर्शविला. तरीही सरकारची राजकीय इच्छाशक्ती जागृत झालेली नाही. याचा निषेध आंदोलनात करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com