मृत्यूच्या सावटामध्ये जगताहेत महामार्गाच्या दुतर्फा असलेली गावे

मृत्यूच्या सावटामध्ये जगताहेत महामार्गाच्या दुतर्फा असलेली गावे

पुणे : दशकभर रखडलेल्या पुणे-बंगळूर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. अनेक ठिकाणी असलेले वळण रस्ते, उड्डाण पुलांची अपूर्ण कामे, भुयारी मार्ग नसणे, पादचारी उड्डाण पूल अजिबातच नसणे अशा अनेक कारणांनी आजही महामार्ग पार करताना जीव मुठीत धरून, भीती डोळ्यात साठवत झपझप पावले टाकावी लागतात. अनेकदा धूम ठोकत महामार्ग ओलांडावा लागतो, त्यात थोडं जरी इकडचं तिकडं झालं की जायबंदी होणं किंवा मृत्यूशी गाठ ठरलेली.... अशीच स्थिती आहे. 

पोलिसांचे कार्यकर्तृत्व मर्यादितच 
पुणे-बंगळूर महामार्गावर सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या वेगाला लगाम लावणारी यंत्रणा कुठेच नाही. वाहने अडवून कारवाई करण्यापलीकडे पोलिसांचे कार्यकर्तृत्व जाताना फारसे दिसत नाही. गाव, वस्तीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करणे, रस्ता सुरक्षित ओलांडण्यासाठी मदत करणे, वाहतुकीचे नियमन करणे यांपैकी काहीही ते करताना दिसत नाहीत. अगदीच कुठे अपघात झाले तर मात्र ते तत्परतेने मदतीला धावून येऊन वाहतूक सुरळीत करतात, सहकार्य करतात, हे खरे. 

निरुपयोगी अंडरपास; शून्य वाहतूक नियंत्रण 
खेड शिवापूर, कापूरव्होळ, भोर फाटा, शिरवळ, पारगाव खंडाळा, वेळे, सुरूर, कवठे, भुईंज, पाचवड, आनेवाडी अशा सर्व ठिकाणी सातत्याने वर्दळ असते. ही गावे महामार्गाच्या दुतर्फा विभागली गेलेली. शेत एका बाजूला तर घर दुसरीकडे; शाळादेखील महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला... अशी स्थिती आहे.

स्वाभाविकच स्थानिकांना दिवसांतून अनेकदा महामार्ग ओलांडावा लागतो. यातील काही गावांच्या ठिकाणी असलेले अंडरपास नावालाच आहेत. पावसाळ्यात तेथे पाणी तुंबणे आणि इतर वेळी त्यांची दुरवस्था अशा कारणांमुळे ते असून नसल्यासारखी स्थिती आहे. त्यांचा वापर अभावानेच होतो. या महामार्गावर कुठेच पादचारी उड्डाण पूल नाहीत. वेगावर नियंत्रण नसलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना ठोकरणे या सर्व टापूत नित्याचेच आहे. आतापर्यंत शेकडो लोकांनी महामार्ग ओलांडताना जीव गमावले आहेत, तर हजारो जायबंदी झालेत. 

पादचारी उड्डाण पूल उभारा 
महामार्ग स्थानिकांच्या दृष्टीने 'यमराजाकडे जाण्याचा राजमार्ग' झाल्याने त्यावर ठोस तोडग्याची अपेक्षा आहे. गावांच्या परिसरामधील प्रस्तावित उड्डाण पुलांची, अंडरपासची कामे होत नाहीत; तोपर्यंत सुसाट वाहतुकीला किमान या परिसरात तरी आवरण्यासाठीची यंत्रणा निर्माण करावी. खूप गर्दीच्या काळात येथे पोलिसांची नेमणूक करावी. तसेच गरजेनुसार काही गावांच्या इथे पादचारी उड्डाण पूल करावेत, ही ग्रामस्थांची मागणी आहे. 

सेवारस्ते नावालाच 
सातारा, भुईंज, पांचवड या परिसरातील सेवारस्त्यांची दुरवस्था झाली आहे; तर काही रस्ते असून नसल्यासारखे अशा स्थितीत आहेत. यातील निम्मे रस्ते वापरण्यायोग्य नाहीत, तर काही रस्ते बंद केले आहेत. सातारा शहर परिसरात हे चित्र अधिक उठावदार आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत असेच चित्र असल्याने शहरवासीयांना महामार्गावरूनच जावे लागते. साहजिकच वळताना, रस्ता ओलांडताना अपघाताच्या भीतीने जीव मुठीत धरून जावे लागते. अनेकदा जवळच्या अंतरासाठीसुद्धा दूरवरून वळून यावे लागते, अशा गैरसोयींना तोंड द्यावे लागते. 

पार्किंगची डोकेदुखी 
महामार्गाला लागूनच हॉटेल, दुकाने आहेत. बहुतांश हॉटेलनी पार्किंगची सुविधा केली असली तरी छोटी हॉटेल्स, विशेषतः गावांजवळील हॉटेलच्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. साहजिकच, त्याने वाहतुकीला अडथळा होतो. कापूरव्होळ, शिरवळ, खंडाळ्याचा परिसर, वेळे ते भुईंज, पांचवड येथे हे चित्र अधिक उठावदार आहे. वेगवान वाहने या ठिकाणी आदळून अपघात झालेले आहेत. तरीही महामार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली नाहीत. 

अरुंद पूल, वाहतुकीची कोंडी 
सध्या काही ठिकाणी पुलांची कामे सुरू आहेत, तर काही पूल सुरू आहेत. अनेक ठिकाणी पुलाच्या तोंडाशी आल्यावर लक्षात येते, की तो अरुंद आहे. मागून वेगाने वाहनांचा ताफाच्या ताफा येतो आणि अचानक अरुंद पूल दिसल्यावर वाहने कशी पुढे न्यायची यांची स्पर्धा लागते. त्याने अपघाताला निमंत्रण मिळू शकते. हे लक्षात घेऊन येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. शिवाय, भुईंज परिसरात तर अरुंद पुलामुळे एकाच बाजूने वाहने येतात आणि जातातही, त्यामुळे अपघाताची टांगती तलवार असते. 

रिफ्लेक्‍टर कुठेच नाहीत 
अनेक ठिकाणी दुभाजक आहेत. त्यांच्या मधोमध झुडपे असल्यास विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाचा त्रास समोरून येणाऱ्या वाहनाच्या चालकाला होत नाही. तथापि, किरकोळ अपवाद वगळता कुठेच अशी झुडपे नाहीत. रस्त्याच्या कडेला फलक असले तरी दुभाजकांना रिफ्लेक्‍टर नाहीत. डोळ्यांवरील ताण आणि दुभाजक लक्षात न येणे यामुळे दुभाजक ओलांडून वाहने गेल्याने अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत. किमान दुभाजकांना विशिष्ट अंतरावर रिफ्लेक्‍टर लावावेत, अशी वाहनचालकांची अपेक्षा आहे.

  • महामार्गाच्या मधोमध झुडपे नसल्याने विरुद्ध बाजूच्या वाहनांच्या प्रखर प्रकाशाने चालकांच्या डोळ्यांवर ताण 
  • प्रमुख आणि गर्दीच्या गावांमध्ये तसेच वर्दळीच्या ठिकाणी विशिष्ट वेळी पोलिस असणे गरजेचे 
  • गावांच्या गरजा लक्षात घेऊन अंडरपास, पादचारी उड्डाण पूल वाढवण्याची गरज 
  • टोल नाक्‍यांवर फिरत्या विक्रेत्यांना मनाई असतानाही बिनदिक्कत विक्री, अपघातांची भीती 
  • अत्यंत अरुंद रस्ते आणि अरुंद पुलांमुळे अचानक वाहनांची गर्दी, पूल रुंद करण्याची गरज 
  • सर्व सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने सुरू करणे, खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी आवश्‍यक 
  • मोठ्या गावांमध्ये महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांबाबत शिस्तीची कारवाई गरजेची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com