'कमवा आणि शिका'चे स्वरूप बदलणार 

File photo of savitribai phule pune university
File photo of savitribai phule pune university

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'कमवा आणि शिका' योजनेचे स्वरूप आता उत्पादक होणार आहे. विद्यार्थ्यांकडून स्टेशनरी उत्पादन करून घेण्याचे काम या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. 

विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थी कल्याण योजनांचा आढावा घेण्याचे काम सध्या विद्यापीठाने सुरू केले आहे. सर्व योजनांच्या पद्धती, त्यातून विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ पुरेसे आहेत का, बदलत्या परिस्थितीत योजनांच्या स्वरूपात काय बदल करता येईल, याचा लेखाजोखा घेतला जात आहे. यात 'कमवा आणि शिका' योजनेत बदल करण्याचा विचार केला जात आहे. त्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न विद्यापीठ करीत आहे. 

विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण योजनांसाठी 45 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय 'कमवा आणि शिका' योजनेत विद्यार्थ्यांना कष्टाच्या कामाबरोबर कौशल्याची कामे दिले जाणार आहेत. विद्यापीठाला आवश्‍यक स्टेशनरीची निर्मिती करताना स्क्रीन प्रिंटिंग इत्यादी कामे त्यात समाविष्ट केली जाणार आहेत. वस्तू निर्मितीच्या दहा कार्यशाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य रुजविण्याचाही विद्यापीठाचा उद्देश आहे, असे या मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले. 

या योजनेमध्ये बदल करण्यासाठी सर्वच योजनांचा लेखाजोखा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या बदलासह नव्या रूपातील योजना लवकरच सुरू होतील. 'कमवा आणि शिका' योजनेत विद्यार्थी उत्पादक काम करणार असल्याने त्यांना मिळणाऱ्या मानधनातही वाढ होऊ शकेल. मात्र, यासंबंधीचा निर्णय हा अधिकार मंडळातील चर्चेनंतर होणार आहे, असे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले. 

मानधनाचे सुधारित दरपत्रक 
'कमवा आणि शिका' योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना मिळणारे मानधन विद्यापीठाने यापूर्वीच 35 रुपये प्रतितासावरून 45 रुपये केले आहे. या दरानुसार विद्यार्थी संख्येनिहाय किती रक्कम महाविद्यालयांना मिळेल, हेही निश्‍चित केले होते. यामध्ये अनेक महाविद्यालयांना संद्धिग्धता होता. त्यासाठी बदललेल्या मानधनाच्या दरासह विद्यापीठाने सुधारित दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com