'देव मंदिरात नव्हे, गोरगरिबांमध्ये शोधा'
पुणे : ''शिकागोच्या धर्म परिषदेद्वारे हिंदू धर्म, संस्कृती व भारतभूमीबद्दलची महती जगभर पोचविण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. 'देव मंदिरात नव्हे, तर गोरगरिबांमध्ये शोधा' हा विचार त्यांनी जगाला दिला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक होते,'' असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स. प. महाविद्यालय चौकातील स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अहिल्यादेवी प्रशाला, डी. ई. एस. प्रशाला आणि रेणुका स्वरूप प्रशालेतील विद्यार्थिनींनी घोषवादन करून अभिवादन केले. वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, अनंत दळवी उपस्थित होते.
भामरे म्हणाले, ''स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचल्यास चांगली जडणघडण होते. विवेकानंदांनी वेद व योगाचे महत्त्व जगाला पटवून दिले.'' 'सारे जहॉंसे अच्छा', 'वंदे मातरम' अशा घोषवाक्यांवर आधारित गीतांचे वादन करण्यात आले. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सूत्रसंचालन आनंद सराफ यांनी केले, तर प्रास्ताविक सूर्यकांत पाठक यांनी केले.