प्रत्येक घरात घडू शकतो ​श्याम : सुमन भोंडवे 

suman Bondave
suman Bondave

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड) आणि श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या (चिंचवड) वतीने प्राधिकरण येथील सुमन भोंडवे यांना यंदा 'श्यामची आई' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे; तर त्यांचे पुत्र आणि उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांना 'श्याम' या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. शुक्रवारी (ता. 23) दुपारी 4 वाजता चिंचवड येथील ऑटो ​क्लस्टर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आई-मुलाशी साधलेला हा संवाद. 

प्रश्‍न : 'श्यामची आई' पुरस्काराबद्दल तुमचे मनोगत ? 
सुमनताई भोंडवे :'श्यामची आई' पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाला आहे. माझे पती शांताराम भोंडवे यांनी कलागुणांना दिलेले प्रोत्साहन आणि आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे माझी चांगली जडणघडण झाली. कोणत्याही कामाचा आळस न करता, 'नाही' हा शब्द बाजूला ठेवून मी सतत प्रयत्न करीत राहिले. हा पुरस्कार जाहीर झाल्याने मुलांवर केलेले संस्कार सार्थकी लागले, असे वाटते. प्रत्येक घरात 'श्यामची आई' असते आणि ती 'श्याम' घडवू शकते. मात्र, त्यासाठी प्रत्येक घरातील 'श्याम'ने 'श्यामच्या आई'चे ऐकले पाहिजे. 

प्रश्‍न : मुलांच्या जडणघडणीमध्ये संस्काराचा मोठा वाटा असतो. तुमच्या तिन्ही मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक मिळविला. त्यातही तुमचा सर्वांत धाकटा मुलगा संकेत हा उज्जैनच्या जिल्हाधिकारी पदापर्यंत पोचला. त्यांच्या या यशामागचे रहस्य काय? 
सुमनताई भोंडवे : माझ्या आई-वडिलांपासून आलेले संस्कार मी माझ्या मुलांवर केले. माझे शिक्षण जुन्या 11 वीपर्यंत झाले. मोठा मुलगा अभिजित डॉक्‍टर, दुसरा मुलगा अमोल इंजिनिअर; तर तिसरा मुलगा संकेत हा जिल्हाधिकारी पदापर्यंत पोचू शकला. मुलांना लहानपणी लाल दिव्याच्या गाडीचे कौतुक वाटत असे; तर संकेतला दहावीपासून सरकारी अधिकारी होण्याची इच्छा होती. पदवीनंतर त्याने 17 परीक्षा दिल्या. प्रयत्नात सातत्य ठेवून आणि एक ध्यास घेऊन त्याने हे यश मिळविले. 

मला घडविण्यात आईचा मोलाचा वाटा : संकेत भोंडवे 
प्रश्‍न : 'श्याम' पुरस्काराबद्दल तुमची भावना काय ? 
संकेत भोंडवे : सानेगुरुजी यांनी लिहिलेले 'श्यामची आई' हे मातृप्रेमावर आधारित पुस्तक आहे. त्या नावाने मिळणारा हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी मला राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, आईमुळे मिळणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे. खरे तर भावना व्यक्त करायला शब्दच नाहीत. 

प्रश्‍न : तुमच्या वाटचालीत आईच्या संस्काराचा वाटा किती? तुमच्या यशाची चतु:सूत्री काय? तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून राबविलेली एखादी यशस्वी योजना सांगा? 
संकेत भोंडवे : मी तीन भांवडांमध्ये शेंडेंफळ. 'श्याम' म्हणून घडण्यात आईचा खूप मोलाचा वाटा आहे. तिचे संस्कार घेऊनच मी आज हा पल्ला गाठू शकलो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट, जिद्द, आत्मविश्वास आणि आई-वडील व गुरुजनांचा आशीर्वाद ही चतु:सूत्री महत्त्वाची आहे. मी दिव्यांग व्यक्ती, दुर्बल घटकांसाठी सामाजिक भावनेतून काम करण्यावर विशेष भर दिला आहे. दिव्यांगांचे लग्न जुळविणे, त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात मला एक वेगळेच समाधान लाभते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com