"पीएमपी'चे प्रवासी उन्हात 

"पीएमपी'चे प्रवासी उन्हात 

पिंपरी - शहरात पीएमपीएमएलचे सुमारे एक हजार 240 बसथांबे आहेत. मात्र, पीएमपीएमएल आणि महापालिका यांनी केवळ 636 थांब्यांवरच शेड उभारले आहेत. तब्बल 604 थांब्यांवर शेड नसल्याने प्रवाशांना उन्हा-पावसात बसची वाट पाहत थांबावे लागते. तसेच, थांब्यांवर बसण्यासाठी अपुरी जागा आहे. काही ठिकाणी रिक्षाचालकच बसथांब्यांशेजारी थांबलेले असतात. पर्यायाने, प्रवाशांना बस पकडण्यासाठी कसरत करावी लागते. 

समस्या 
* बसथांब्यांवर पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा अभाव 
* बऱ्याच बसथांब्यांशेजारी फळे, भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण 
* अनधिकृत जाहिरात पत्रक चिटकविल्याने बसथांब्यांच्या सौंदर्याला बाधा 
* दुचाकी, चारचाकी वाहने व रिक्षा बेकायदा उभे करण्याचे प्रमाण मोठे 
* बीआरटीएस बसथांब्यावर सुरक्षारक्षक, मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव 
* वेळापत्रक, नकाशे, संपर्क क्रमांक आदी बाबींचा अनेक थांब्यांवर अभाव 
* बस थांबण्यासाठी आखला जाणारा "बस बे' बहुतांश ठिकाणी नाही 

वर्दळीच्या स्थानकांची स्थिती 
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी (महापालिका भवनाजवळ) - येथील थांब्यावर नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. शेड तुटलेली आहे. प्रवाशांना बसची वाट पाहात उन्हातच ताटकळत थांबावे लागते. 

* चापेकर चौक, चिंचवडगाव (चिंचवड बाजारपेठ आणि महापालिका शाळेजवळ) - येथील थांबा पदपथावरच आहे. पादचाऱ्यांना त्रासदायक आहे. प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. रस्त्यावरच थांबावे लागते. 

* निगडी बस स्थानक (निगडी बाजारपेठ आणि "फ' क्षेत्रीय कार्यालयाजवळ) - येथे अपुरे शेड आहे. बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. रस्त्यातच रिक्षा थांबतात. प्रवासी व बसचालकांना त्रासदायक आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. 

* चिंचवड स्टेशन उड्डाण पूल (एटीएसएस कॉलेजजवळ) - येथे थांब्याशेजारी रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहत थांबतात. त्यामुळे बसने नियमित प्रवास करणाऱ्यांना बसमध्ये बसण्यासाठी धावपळ करावी लागते. 

* हॉटेल सिट्रसजवळील बसथांबा, पिंपरी (मुख्य वर्दळीच्या पिंपरी चौकाजवळ) - या थांब्यावर पीएमपीच्या बस क्वचितच थांबतात. त्यामुळे या थांब्याचा हवा तितका उपयोग झालेला नाही. रात्री थांब्याशेजारीच खासगी वाहने उभी असतात. 

गर्दीचे मार्ग (बसथांब्याची संख्या रस्त्याच्या एका बाजूची) 
- डांगे चौक ते हिंजवडी - चार थांबे - हिंजवडी आयटी पार्कसाठी सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात नोकरदारांची ये-जा असते. गणेशनगर, भूमकर वस्ती, हिंजवडी येथे बसशेडचा अभाव आहे. त्यामुळे बसची वाट पाहत उन्हातच थांबावे लागते. 
- निगडी ते दापोडी - 18 बसथांबे - बीआरटीएस बसथांबे दोन्ही बाजूचे 36 - पिंपरी चौकातील बसथांब्यांच्या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी अपुरी व्यवस्था आहे. बसशेड पुरेसे नाहीत. चिंचवड स्टेशन, वल्लभनगर, नाशिक फाटा आदी ठिकाणीही हीच स्थिती आहे. शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गातील रस्त्यावर सतत वर्दळ असते. 
- डांगे चौक ते काळेवाडी फाटा - चार बीआरटीएस थांबे - येथील बीआरटीएस बसथांब्यावर बसविलेल्या बाकांची संख्या कमी आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षकांसाठी पंचिंगची सोय, नकाशा आदी सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते. टीव्ही स्क्रीनवर ये-जा करणाऱ्या बसची माहिती दिली जाते. कचरापेट्या आहेत. बस क्रमांकांची माहिती मिळते. 
- पिंपरी ते काळेवाडी फाटा - आठ बसथांबे त्यात चार बीआरटीएस - नढेनगर येथे बसशेड नाही. काळेवाडी मुख्य बसथांबा, हनुमान मंदिर आदी ठिकाणी बसशेड आहेत. वेळापत्रक, नकाशा, संपर्क क्रमांक आदी सुविधा नाहीत. बीआरटीएस मार्ग अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे बीआरटीएस बसथांब्यांचा सध्या वापर होत नाही. रात्री रस्त्यावर बरीच गर्दी असते. 

नवीन अठरा मार्गांवर बसथांबे उभारणार 
"पीएमपीएमएल'तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने 18 मार्ग नियोजित आहेत. त्यानुसार त्या मार्गांवर कोठे बसथांबे उभारायचे नियोजन आहे. सध्या शहरात थांबा पाट्या जास्त प्रमाणात आहेत. तुलनेत बसथांब्यांचे प्रमाण अल्प आहे, अशी माहिती "पीएमपीएमएल'च्या वाहतूक विभागातर्फे देण्यात आली. 

* "पीएमपीएमएल'ने उभारलेले बसथांबे - पुणे व पिंपरी-चिंचवड - 2760 
* शहरातील थांबे - रस्त्याच्या एका बाजूचे थांबे पाट्या व शेड - 1240 
* स्टेनलेस स्टीलमधील बसथांबे - 222 
* साध्या शेडचे बसथांबे - 80 
* महापालिकेने अंतर्गत रस्त्यावर (फीडर रूट) उभारलेले थांबे - 255 

बीआरटीएस मार्गावरील थांबे सद्य-स्थिती 
* सांगवी-किवळे 21 पूर्ण 
* निगडी-दापोडी 36 पूर्ण 
* नाशिकफाटा-वाकड 14 पूर्ण; 1 बाकी 
* काळेवाडी फाटा-देहू-आळंदी रस्ता - 8 पूर्ण; 19 बाकी 
* प्रत्येक बसथांब्याचा खर्च - सरासरी 42 लाख 

स्थानक/थांब्याची उभारणी कशी होते? 
बस मार्गानुसार नागरिकांची पीएमपीएमएलकडे असलेली बस स्थानक व बसथांबा उभारणीची मागणी लक्षात घेऊन त्याबाबत नियोजन केले जाते. दोन बसथांब्यांचे किलोमीटरनुसार अंतर तपासून नागरिकांना घराजवळ सहज बसने ये-जा करता येईल, अशा जागा निवडल्या जातात. पीएमपीएमएलच्या वाहतूक विभागाकडून त्यासाठी आवश्‍यक सर्वेक्षण होते. त्यानंतर त्यासाठी आवश्‍यक खर्चाला "पीएमपीएमएल' प्रशासनाची मंजुरी घेऊन बसथांब्याची उभारणी होते. बसथांबे निश्‍चित केलेल्या निकषानुसार आणि नमुन्यानुसार उभारले जातात. बसथांब्यांवरील जाहिरात हक्क खासगी कंत्राटदाराला देण्याबाबत धोरण निश्‍चित करून बसथांबे उभारणी आणि देखभालीचा खर्च भागविण्यावर पीएमपीएमएल व्यवस्थापनाचा सध्या भर आहे. 

महापालिकेतर्फे शहरातील विविध बीआरटीएस रस्त्यांवर बसथांबे उभारले आहेत. अंतर्गत फीडर रूटवरही बसथांब्याची उभारणी केली आहे. भक्ती-शक्ती चौक (निगडी) ते मुकाई चौक (किवळे) या बीआरटीएस रस्त्यावर नव्याने आठ बसथांबे उभारले आहेत. दिघी ते आळंदी रस्त्यावर पीएमपीएमएलची बससेवा सुरू आहे. मागणीनुसार त्या ठिकाणीदेखील आवश्‍यक बसथांबे उभारले जातील. 
- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस 

शहरात आवश्‍यकतेनुसार आणि प्रवाशांच्या मागणीनुसार बसथांबे उभारलेले आहेत. भविष्यात नव्याने होणाऱ्या बसमार्गांसाठी वाहतूक विभागाकडून आवश्‍यक सर्वेक्षण करून बसथांबे निश्‍चित केले जातील. "बस-बे'बाबत पीएमपीएमएलच्या स्थापत्य विभागाकडून आखणी केली जाते. वापरण्यास योग्य, अडचणीचे बसथांबे आणि नव्याने गरज असलेल्या बसथांब्यांची माहिती काढलेली नाही. 
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल 

पिंपरी परिसरात नागरिकांकडून बसशेडची मागणी झाल्यास खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या निधीतून बसथांबे उभारले जातात. त्याशिवाय, शहरातील काही कंपन्यांकडून बसथांबे उभारून मिळू शकतील का, यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. कंत्राटदारांमार्फत "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावरदेखील बसथांबे उभारून मिळतात. 
- एन. आर. घोगरे, आगारप्रमुख, नेहरूनगर 

शहरात विविध भागांमध्ये बसशेड नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना उन्हाचा त्रास होतो. जिथे बसशेड नाहीत, तिथे व्हायला हवे. नवीन समाविष्ट गावांमध्ये प्रामुख्याने बसशेडचा अभाव आहे. 
- चिंतामण गायकवाड, वाहक 

हिंजवडीच्या मुख्य चौकातच प्रवाशांसाठी बसशेड नाहीत. त्यामुळे आम्हाला उन्हातच थांबावे लागते. बसशेड उभारल्यास प्रवाशांना उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच, बसण्याची व्यवस्थादेखील होईल. 
- मुकेश साहू, हिंजवडी 

शहरात काही भागांमध्ये बसशेड नाहीत. त्यामुळे प्रवास करताना रस्त्यावर उन्हातच थांबावे लागते. बसथांबा असतानाही बऱ्याचदा बस न थांबविता चालक निघून जातात. त्यामुळे गैरसोय होते. 
- छाया गवारे, गृहिणी 

उन्हामुळे होणारा त्रास 
* मोठ्या प्रमाणात घाम येत असल्याने थकवा जाणवतो. 
* शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होते 
* त्वचेला आणि डोळ्यांना जळजळ होते 
* अतिशय उष्ण वातावरणात उष्माघाताचा त्रास संभवतो 

अशी काळजी घ्यावी 
* भरपूर पाणी प्यावे 
* लिंबू सरबत, ताक, कैरीचे पन्हे आदी घ्यावे 
* डोळ्यांसाठी गॉगल, डोक्‍यावर कॅप, महिलांनी स्कार्फचा वापर करावा 
* सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे सुती आणि पांढरे कपडे वापरावेत 
* फार दगदग होईल, अशी कामे उन्हात करू नयेत 
* उन्हात सलग काम न करता थोडी-थोडी विश्रांती घ्यावी 
* हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com