'बालगंधर्व'मधील हॉल बंदच; नाटकाची तालीम करायची कोठे? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या मंचावरून नाटक सादर करण्याआधी रंगमंदिराच्या तळमजल्यात असलेल्या हॉलमध्ये तालीम व्हायची... हा हॉल गेली कित्येक वर्षे बंद स्थितीत आहे. या हॉलबरोबरच संगीत नाटकांची विस्मरणात गेलेली सवलतही पुन्हा सुरू व्हावी, अशा मागण्या नाट्यवर्तुळातून होत आहेत. 

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या मंचावरून नाटक सादर करण्याआधी रंगमंदिराच्या तळमजल्यात असलेल्या हॉलमध्ये तालीम व्हायची... हा हॉल गेली कित्येक वर्षे बंद स्थितीत आहे. या हॉलबरोबरच संगीत नाटकांची विस्मरणात गेलेली सवलतही पुन्हा सुरू व्हावी, अशा मागण्या नाट्यवर्तुळातून होत आहेत. 

बालगंधर्व रंगमंदिराचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्ताने नाट्यवर्तुळातून काही अपेक्षाही व्यक्त होत आहेत. रंगमंदिराच्या तळघरात नाटकाच्या तालमीसाठी हॉल बांधण्यात आला होता. तेथे पावसाचे पाणी शिरत असल्याने तो बंदच ठेवला गेला. पण, चार वर्षांपूर्वी कलाकारांनी एकत्र येऊन आवाज उठवल्यानंतर त्या हॉलची दुरुस्ती करण्यात आली; परंतु तो हॉल तालमीसाठी सुरूच झाला नाही. जवळपास पाचशे चौरस फुटांचा हॉल सध्या वापराविना पडून आहे. शिवाय, व्हीआयपी कक्षावरील आणखी एक हॉल बंद स्थितीत आहे. 

रंगमंदिरात उंदरांचा त्रास वाढला आहे. आवारात दारूच्या बाटल्या सापडतात. रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी व्यवस्थापकांना दिला जात नाही. पिण्याच्या पाण्याची चांगली सोय नाही. कलादालनात जाण्यासाठी लिफ्ट नाही. पावसाळ्यात रंगमंदिराच्या आवारात पाणी साचते, या अडचणींकडे लक्ष द्यायला हवे, असे 'संवाद'चे सुनील महाजन यांनी सांगितले. गायिका- अभिनेत्री कीर्ती शिलेदार म्हणाल्या, ''संगीत नाटकांना ऊर्जितावस्था यावी म्हणून दोन संगीत नाटकांकडून अत्यंत माफक दरात भाडे घेतले जायचे. ही सूचना आईने (जयमाला शिलेदार) केली होती, ती लगेच मान्य झाली; पण काही वर्षांनी बंद पडली, ती पुन्हा सुरू व्हावी.'' दरम्यान, व्यवस्थापक प्रकाश अमराळे म्हणाले, ''तालमींसाठी रंगमंदिराच्या आवारातच नवा हॉल उभारण्याचे आमदार विजय काळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, इतर अडचणीही सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.'' 

...अन्‌ कॅमेऱ्याचीच चोरी 
बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, येथे चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून रंगमंदिराच्या आवारात चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; पण गेल्या काही दिवसांपूर्वी यातील काही कॅमेऱ्यांचीच चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बालगंधर्व पोलिस चौकीत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.