बारामती - अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या कार्यकक्षेतील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ

crime
crime

बारामती : येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या कार्यकक्षेतील गुन्ह्यांच्या संख्येत गतवर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. सन 2016 च्या तुलतनेत सन 2017 मधील गुन्ह्यांचा चढता आलेख चिंताजनक असून पोलिसांच्या संख्याबळात वाढ करणे आता तातडीचे बनल्याचेच ही आकडेवारी स्पष्ट करते आहे. 

बारामती अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या कार्यकक्षेत बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण, दौंड, यवत, शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, लोणीकंद, हवेली, लोणीकाळभोर, वेल्हा, भोर, राजगड, जेजुरी व सासवड अशी 17 पोलिस ठाणी येतात. 

या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सन 2016 या वर्षात सर्व मिळून नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या होती 5236 आणि सन 2017 मध्ये हाच आकडा आहे तब्बल 7609 इतका. यातही 2016 मध्ये 1391 चो-यांची नोंद झाली तर 2017 मध्ये हा आकडा आहे 2701. दिवसा चोरी व घरफोडीच्या 2016 मध्ये 197 घटना घडल्या 2017 मध्ये त्याची संख्या 432 वर जाऊन पोहोचली. 

गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण पोलिस अधीक्षक सुवेझ हक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी लक्षणीय केले. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येकाची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश असल्याने सन 2017 मध्ये गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसते. प्रत्येकाला न्याय देण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता, प्रत्येक चोरी, घरफोडी, दरोडा किंवा इतर काही गुन्हे असले तरी त्याची तातडीने नोंद करुन घेण्याचे प्रमाण शंभर टक्के झाल्याने आकडेवारी अधिक दिसत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 
या कालावधीत दहा जणांविरुध्द मोक्काची तर 176 जणांवर तडीपारीची कारवाई पोलिसांनी केली. 710 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 

संपूर्ण पुणे जिल्ह्यात फक्त 3200 पोलिस कर्मचारी तैनात आहे. जिल्ह्याची लोकसंख्या व पोलिसांची संख्या यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त आहे. पोलिसांकडे असलेल्या विविध जबाबदाऱ्या व कामाचा प्रचंड ताण याचा परिणाम कार्यक्षमतेवर होत असून गुन्हेगारी रोखण्यासह गुन्हे उघड होण्यासाठी दुप्पट मनुष्यबळाची गरज पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांना आहे. वाढते शहरीकरण, नव्याने निर्माण होणारी गुन्हेगारी आणि अल्पवयीन मुलांचाही वाढलेला गुन्हयातील सहभाग या मुळे गुन्ह्यांची संख्या वाढतच आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com