बारामती: तीन सराईत दरोडेखोरांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

बारामती : एका वयोवृध्द दांपत्याच्या चोरीदरम्यान झालेल्या मृत्यूस कारणीभूत असलेले व दरोड्याच्या तीन गुन्ह्यात सहभागी तीन सराईत दरोडेखोरांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. अवघ्या तीन महिन्यात या क्लिष्ट गुन्ह्यांचा शिताफीने तपास केल्याने पोलिसांचे या प्रकरणी कौतुक होत आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, बारामतीचे उपविभागीय अधिकारी बापू बांगर तसेच दौंडचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

1 एप्रिल 2017 रोजी दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे रामभाऊ तुकाराम गोडगे यांच्या घरावर दरोडा पडला होता. चोरी दरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तुकाराम यशवंत गोडगे व रुक्मिणी तुकाराम गोडगे हे दांपत्य जबर जखमी झाले होते. उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर पोलिसांपुढे या दरोड्याचा तातडीने शोध घेण्याचे आव्हान होते. 

या अगोदर 28 मार्च 2017 रोजी महादेव मारुती लोणकर (रा. ठाकूरवस्ती, म्हसणेरवाडी, ता. दौंड) यांच्या घरावर पहाटे दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. या घटनेतही लोणकर व त्यांच्या मुलाला गंभीर  स्वरुपाची मारहाण करण्यात आली होती. 

त्या पाठोपाठ 17 एप्रिल 2017 रोजी अर्चना कल्याण धावडे (रा. आवळेवस्ती, खोरवडी, ता. दौंड) या घरात झोपल्या होत्या. चोरट्यांनी घराच्या दरवाजावर दगड घालून दरवाजा तोडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. या चोरीदरम्यानही घरातील महिला व पुरुषांना चोरट्यांनी मारहाण केली होती. 

या तिन्ही घटनात ग्रामस्थांना झालेल्या मारहाणीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, बारामतीचे गुन्हे शोध पथकांनी संयुक्तपणे कारवाई सुरु केली. बारामतीच्या पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस कर्मचारी शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, अनिल काळे, संदीप मोकाशी, रवीराज कोकरे, सुभाष डोईफोडे, संदीप जाधव, दशरथ कोळेकर, तुषार सानप, सदाशिव बंडगर, आसिफ शेख, हरि होले, सुनील सस्ते यांनी माहिती मिळविली. 

या दरोड्यात सागर याद्या पवार (वय 22, रा. काष्टी, जि. नगर), कुच्या उर्फ विशाल अनंत उर्फ पोपट पवार (वय 28, रा. काष्टी) तसेच सल्या अदिक्या चव्हाण (वय 23, रा. खोरवडी, ता. दौंड) या तिघांना शिताफीने अटक केली. यात एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दरोड्यात बारा जणांचा समावेश असून सर्वांची नावे निष्पन्न झाली असून येत्या काही दिवसात आणखी तिघांना जेरबंद केले जाईल, असे डॉ. संदीप पखाले यांनी नमूद केले. या गुन्ह्यातील 80 हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.