दौंड: गोळीबार प्रकरणी तपासासाठी दोन पोलिस महानिरीक्षक शहरात दाखल

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 17 जानेवारी 2018

दौंड : दौंड शहरात सहाय्यक उपनिरीक्षक संजय शिंदे याने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता होती. सदर गंभीर प्रकरणाची चौकशी, तपासकाम आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन पोलिस महानिरीक्षक, एक महानिरीक्षक, एक पोलिस अधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा शहरात तळ ठोकून आहे. 

दौंड : दौंड शहरात सहाय्यक उपनिरीक्षक संजय शिंदे याने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता होती. सदर गंभीर प्रकरणाची चौकशी, तपासकाम आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन पोलिस महानिरीक्षक, एक महानिरीक्षक, एक पोलिस अधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा शहरात तळ ठोकून आहे. 

दौंड शहरात संजय शिंदे याने शासकीय पिस्तूल मधून झाडलेल्या गोळ्यांमुळे परशुराम गुरूनाथ पवार (वय ३३, रा. वडारगल्ली, दौंड), गोपाळ काळुराम शिंदे (वय ३५, रा. वडारगल्ली, दौंड) यांचा नगरमोरी चौकात तर अनिल विलास जाधव (वय ३०, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड) याचा चोरमले वस्ती येथे जागीच मृत्यू झाला होता. संजय शिंदे यास सुपे (ता. पारनेर, जि. नगर) येथे नाकाबंदीत ताब्यात घेतल्यानंतर तणाव कमी झाला होता.

दरम्यान आज (ता. १७) सकाळी दैनंदिन व्यवहार सुरळित झाले होते. दरम्यान काही युवकांनी अंत्ययात्रा होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची मागणी केल्याने हिंद थिएटर - डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक - महात्मा गांधी चौक ते भाजी मंडई पर्यंतची दुकाने बंद ठेवण्यात आली. शहराच्या उर्वरित भागात दैनंदिन व्यवहार सुरू होते. शाळा, महाविद्यालये, बँका, आदी सुरू होते परंतु दुपारी तीन वाजेपर्यंत शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण होते. तिन्ही मृतांचे शवविच्छेदन पुणे येथे करण्यात आले व आज (ता. १७) दुपारी त्यांचा अंत्यविधी भीमा नदीकाठी केला जाणार असल्याने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील संवेदनशील भागात राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, एक दंगल नियंत्रण पथकासह जिल्ह्यातील अन्य पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे मंगळवारी (ता. १६) रात्री पासून दौंड शहरात तळ ठोकून आहेत. संशयित मारेकरी याच्यासंबंधी माहिती संकलित करणे, गुन्ह्यामागील हेतू आणि विविध शक्यता पडताळून गुन्ह्याच्या तपासकामासंबंधी ते संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सुवेझ हक हे आज (ता. १७) सकाळीच शहरात दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळासह अन्य ठिकाणी पाहणी करून तपासासंबंधी सूचना दिल्या आहेत. दौंड पोलिस ठाण्यात सुवेझ हक यांनी शहरातील व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 
                  
राज्य राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक सुरेश मेखला व उप महानिरीक्षक संदीप कर्णिक हे दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलाचा भाग असलेल्या इंडियन रिझर्व बटालियनच्या (गट क्रमांक सोळा, कोल्हापूर) तीन तुकड्या राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातच्या प्रांगणात असल्याने सुरेश मेखला व संदीप कर्णिक यांनी सर्व संबंधितांकडे चौकशी करून अभिलेखांची पाहणी केली. 

 

Web Title: Marathi news pune news daund firing