कचरा जाळल्याने अपघाताचा धोका

garbege
garbege

हडपसर- गाडीतळ उड्डाणपूलाखाली नियमितपणे कचरा जाळला जातोय. याच ठिकाणी मोठया प्रमाणात दुचाकी पार्कींग केलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. तर जाळलेल्या कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. महापालिकेचेच कर्मचारी हा कचरा साठवून जाळतात अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. कचरा जाळण्यास बंदी आहे. त्यामुळे महापालिका सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करते. मात्र खुद्द महापालिकेच्या आरोग्य विभागाचेच कर्मचारी कचरा जागोजागी जाळतात, याबाबत कोणतीही कारवाई होत नाही.

नागरिक संजय लवाटे म्हणाले, हडपसर परिसरात पालिकेचे कर्मचारीच गोळा केलेला कचरा जाळतात. प्रदूषणाची समस्या गंभीर झालेली असतानाही यापद्धतीने कचरा जाळण्यात येत आहे. याची पालिकेने दखल घ्यावी.

विभागीय आरोग्य अधिकारी दिनेश भेंडे म्हणाले, पालिकेचे कर्मचारी कचरा जाळत असतील तर याबाबत नागरिकांनी आम्हाला माहिती दयावी. दोषी कर्मचा-यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र नागरिकांनी देखील कचरा उघडयावर, नाल्यात, ओढयात टाकू नयेत. 2005 नंतरच्या सर्व सोसायटयांनी गांडूळखत प्रकल्प सुरू करणे बंधनकारक आहे. मात्र ज्या सोसायटया नियमबाह्य कच-याची विल्हेवाट लावतात, त्यांना देखील आम्ही नोटीसा दिल्या आहेत. 

नागरिक संजय सातव म्हणाले, रोज निर्माण केलेल्या कचर्‍याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक वाढतात. पण, तो कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कचरा हा योग्य पद्धतीने निकाली काढला गेला पाहिजे. सर्व कचरा हानिकारक नसतो. कचर्‍याचे अनेक प्रकार असतात. त्यातील मुख्य दोन प्रकार म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय. असेंद्रिय कचरा अनेक पद्धतीने पुन्हा वापरण्यासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. सेंद्रिय कचरा, प्रत्येक माणसाला उपयोगात आणणे सहज शक्य आहे. पण, या सगळ्यासाठी इच्छाशक्ती असणं अत्यावशक आहे. कचर्‍यागकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे. विशेशतः मोठया सोसायटयांनी याबाबत कचरा प्रकीया प्रकल्प योग्य रितीने चालवायला हवेत.

सविता जाधव म्हणाल्या, शहरातून गोळा होणारा कचरा आपण लांब कुठेतरी नेऊन पुरतो किंवा फेकतो आणि तिथे कचर्‍याचे डोंगर रचतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्या-मोठ्या शहरांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दूरवर पसरलेले प्लास्टिक व कचर्‍यानचे डोंगर आपल्याला पहायला मिळतात. वर्गीकरण न करता, कुठलीही प्रक्रिया न करता अशा प्रकारे टाकलेला कचरा हा सर्वच दृष्टीने हानिकारक असतो. 

सविता माटे म्हणाल्या, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यांमुळे तयार होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण व प्रकार वाढत जातात आणि वेगवेगळया समस्या निर्माण होतात. अस्वच्छता, आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न त्यातूनच निर्माण होतात. कचर्‍या ची विल्हेवाट लावायची सर्वांत सोपी व स्वस्त पद्धत म्हणजे तो पुरणे किंवा उघड्यावर जाळणे. पण त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. उघड्यावर जाळल्यामुळे किंवा अशास्त्रीय पद्धतीने पुरल्यामुळे हवा, भूजल आणि माती दूषित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com