नगरपालिकेविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे सहाय्यक अभियंत्यांना आदेश

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

दौंड (पुणे) : दौंड शहरातील पाटबंधारे विभागाच्या निरीक्षण पथाच्या जागेत दौंड नगरपालिकेस कोणतेही काम करण्यात मज्जाव करणे आणि काम करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने खडीकरणाच्या कामासाठी प्रकाशित केलेली ई-निविदा दुसऱ्यांदा वादात सापडली आहे. 

दौंड (पुणे) : दौंड शहरातील पाटबंधारे विभागाच्या निरीक्षण पथाच्या जागेत दौंड नगरपालिकेस कोणतेही काम करण्यात मज्जाव करणे आणि काम करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने खडीकरणाच्या कामासाठी प्रकाशित केलेली ई-निविदा दुसऱ्यांदा वादात सापडली आहे. 

दौंड शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक माने यांनी या ई-निविदासंबंधी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार व बेमुदत उपोषण केल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत. शहरात नवीन मुळा उजवा कालव्याची वितरिका क्रमांक 30ची लघु चारी (वितरिका) असून सदर चारीशेजारी पाटबंधारे विभागाचे 18 मीटर रूंदीचे निरीक्षण पथ आहे. परंतु त्याच्यावर जागोजागी अतिक्रमण झालेले आहे. दौंड नगरपालिकेने या निरीक्षण पथावर परवानगी न घेता तीन किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन टाकल्याने पाटबंधारे विभागाने दौंड पोलिस ठाण्यात 26 मार्च 2015 रोजी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांच्यासह एकूण चार जणांविरूध्द अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर नगरपालिकेच्या 7 मे 2015 रोजी पार पडलेल्या खास सभेत सदर निरीक्षण पथास सार्वजनिक रस्ता घोषित करण्यासंबंधी ठरावास मतदानाने मंजूरी देण्यात आली होती.  

पाटबंधारे विभागाने 29 जुलै 2015 रोजी नगरपालिकेला बाजार मुल्यानुसार होणारी रक्कम भरण्याबाबत आणि सदर जागा सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित न करण्याबाबत पत्राद्वारे कळविले होते. तरीदेखील ऑगस्ट 2017 मध्ये नगरपालिकेने निरीक्षण पथाचे खडीकरण करण्यासाठी 74 लाख रूपयांची ई-निविदा प्रकाशित केली होती. माने यांनी त्याविरूध्द विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर नगरपालिकेला सदर कामासंबंधी ठेकेदारास कार्यारंभ आदेश न देण्याचा आदेश देण्यात आला होता. 

दरम्यान 15 जानेवारी 2018 रोजी नगरपालिकेने पुन्हा सदर रस्ता खडीकरण करण्यासाठी 66 लाख 96 हजार रूपये अंदाजपत्रकीय मूल्य असलेली ई-निविदा प्रकाशित केली व त्यानंतर ठेकेदारास कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला होता. परंतु या बाबत निविदेची चौकशी करून कारवाई करणे व अन्य मागण्यांसाठी विनायक माने यांनी पुणे येथील सिंचन भवन येथे 12 फेब्रुवारीला बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाची दखल घेत खडकवासला पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी दौंड येथील सहायक अभियंता यांना सदर क्षेत्रात नगरपालिकेने काम करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट लेखी आदेश दिल्यानंतर माने यांनी उपोषण स्थगित केले आहे. 

Web Title: Marathi news pune news irrigation crime engineer