महाराष्ट्र बंदला विश्रांतवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

vishrantwadi
vishrantwadi

विश्रांतवाडी : भिमा कोरेगाव येथे काल झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला विश्रांतवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील दुकाने, हॉटेल्स, मॉल, खाजगी कार्यालये बंद होती. विविध आंबेडकरवादी चळवळीच्या व संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात आंदोलन केले. दलित चळवळीतील कार्यकर्ते सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास मोठ्या संख्येने जमा झाले. या जमावाने पोलिस चौकीपासून मच्छीमार्केट, चव्हाणनगर, बिग बझार आदी साधारण 1 किलोमीटर परिसरात रॅली काढली. त्या गटाची रॅली चालू असतानाच त्यानंतर साडेअकरानंतर वाडीच्या मुख्य चौकात दुसरा जमाव जमला. काही जणांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. जमावाने ‘मिलिंद एकबोटे मुर्दाबाद’ अशा घोषणा देत त्यांनी मिलिंद एकबोटे व भिडे गुरुजी यांच्या अटकेची व त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली. तसेच  मिलिंद एकबोटे व भिडे गुरुजी यांचे 2 पुतळ्यांना जोडे मारून नंतर ते पुतळे जाळण्यात आले. एक तासभर मुख्य चौकात जमाव असल्याने एक प्रकारे रस्ता रोको आंदोलन झाले. यावेळी दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत साळवे यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. हा जमाव पांगल्यानंतर काही तरुणांनी पीएमपीएमएलची बसगाडी अडवून ठेवली. परंतु पोलिसांच्या दक्षतेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

नंतरही लोक गटागटाने थांबून चर्चा करीत होते. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. यावेळी दलित चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे या म्हणाल्या की, 200 वर्षांनंतरचा हा कार्यक्रम होता. याची पोलीस व प्रशासनाला पूर्वकल्पना होती. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवायला हवा होता. पोलीस व सरकार यात अपयशी ठरले. सांस्कृतिक दहशतवाद संपून येथे लोकशाही नांदली पाहिजे. दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन भिडे व एकबोटे यांना पाठीशी घालणारे भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. अनेक संघटनांतर्फे एकबोटे व भिडे यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता पाटील म्हणाल्या की, काही अनुचित घडू नये यासाठी पोलीस व्यवस्थित लक्ष ठेवून होते. 100-125 पोलिसांची फौज यासाठी तैनात करण्यात आली होती. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता पाटील म्हणाल्या की, आम्ही काही अनुचित घडू नये यासाठी पोलीस व्यवस्थित लक्ष ठेवून होते. 100-125 पोलिसांची फौज यासाठी तैनात करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com