निविदेत अडकली गोरगरिबांची औषधे 

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पुणे - गोरगरीब रुग्णांना गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारांवर उपचारांसाठीची महापालिकेची शहरी गरीब योजना निविदा प्रक्रियेत अडकली आहे. तांत्रिक कारणाने पुरवठाच बंद झाल्याने महागड्या औषधांसाठी गरीब रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांत खेटे मारत आहेत. 

पुणे - गोरगरीब रुग्णांना गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारांवर उपचारांसाठीची महापालिकेची शहरी गरीब योजना निविदा प्रक्रियेत अडकली आहे. तांत्रिक कारणाने पुरवठाच बंद झाल्याने महागड्या औषधांसाठी गरीब रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांत खेटे मारत आहेत. 

कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड विकार अशा आजारांच्या उपचारांसाठी महागडी औषधे सातत्याने घ्यावी लागतात. डॉक्‍टर, रुग्णालय, रोगनिदानासाठी महागड्या चाचण्या आणि औषधे यांचा खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्‍याबाहेर जातो. यासाठी शहरी गरीब योजनेतून ही औषधे रुग्णांना मोफत देण्यात येतात. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधून ही औषधे उपलब्ध करून दिली जातात. महापालिकेमध्ये अशा 10 हजार कुटुंबांची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयांमध्ये शहरी गरीब योजनेतील औषधांचा खडखडाट आहे. ही औषधे घेण्यासाठी गंभीर आजाराचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक सातत्याने रुग्णालयांमध्ये हेलपाटे मारत आहे; पण त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. 

काकांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांना सांगितलेली औषधे आतापर्यंत शहरी गरीब योजनेतून मिळत होती; पण औषधांसाठी गेल्या महिन्यापासून सातत्याने गाडीखान्यात येत आहे; पण ही औषधे उपलब्ध नसल्याचे येथील औषध विक्रेते सांगतात. आठ दिवसांनी मिळतील, दहा दिवसांनी मिळतील, असे सांगून आता महिना उलटला. डॉक्‍टर औषधे घेण्यासाठी मागे लागतात; पण ही महाग औषधे घेणार तरी कशी, असा प्रश्‍न पडला आहे. 
- अविनाश सोनवणे 

महापालिकेत 2010 पासून ही योजना सुरू झाली आहे. दरवर्षी नवीन निविदा काढून शहरी गरीब योजनेसाठी औषधखरेदी होते. या वर्षीचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यामध्ये ही औषधे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. 
डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका. 

शहरी गरीब योजनेतील औषधे सध्या रुग्णालयात मिळत नाहीत; पण इतर सर्व औषधे रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. डॉक्‍टरांनी लिहून दिलेली गंभीर आजारांची औषधे शहरी गरीब योजनेतून दिली जातात. रुग्णांनी ही औषधे खरेदी करून त्याचे बिल महापालिकेला जमा केल्यास खर्चाच्या निम्मी रक्कम परत मिळते. 
डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका 

नेमका अडथळा कोणता? 
शहरी गरीब योजनेतील औषधांची खरेदी नवीन आर्थिक वर्षात केली जाते. या खरेदी प्रक्रियेसाठी किमान दीड ते दोन महिने लागतात. त्यामुळे 1 एप्रिलला सुरू केलेली खरेदी प्रक्रिया 15 मे रोजी पूर्ण होईल. त्यानंतर म्हणजे अजून दीड महिन्याने शहरातील गरीब रुग्णांसाठी अत्यावश्‍यक औषधे उपलब्ध होतील, अशी माहिती महापालिकेतून मिळाली. 

कमी आर्थिक तरतूद? 
शहरी गरीब योजनेतून औषधखरेदीसाठी सात कोटी रुपयांची मागणी केली जाते; पण जेमतेम चार ते पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होतो. या निधीतून खरेदी केलेली औषधे डिसेंबरपर्यंत संपतात. त्यामुळे पुढील तीन महिन्यांची औषधे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. गेल्या वर्षी पाच कोटी रुपये मंजूर केले होते; मात्र या वर्षीच्या तरतुदीमध्ये एक कोटी रुपयांना कात्री लावून चार कोटी रुपये करण्यात आली. 

Web Title: medicine for poor