मीटरने पाणीपुरवठा होणाऱ्यांच्या बिलांची दुरुस्ती होणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - मीटरने पाणीपुरवठा होणाऱ्या नळजोडधारकांकडील पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने बिलदुरुस्तीची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे पाणीपट्टीची थकबाकीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. 

पुणे - मीटरने पाणीपुरवठा होणाऱ्या नळजोडधारकांकडील पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने बिलदुरुस्तीची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे पाणीपट्टीची थकबाकीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. 

शहर आणि उपनगरांमध्ये सध्या 42 हजार 703 नळजोडांना मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार पाणीपट्टी आकारली जाते. या नळजोडधारकांकडे सुमारे 494 कोटी 65 लाख रुपयांची थकबाकी आहे; मात्र दुबार पाणीपट्टी आणि मीटर नादुरुस्त असल्याने ही पाणीपट्टी वसूल होत नसल्याचे आढळून आले, तर काही भागांत मीटरचा वापर होत नसतानाही त्यांना मीटरच्या दरानुसार पाणीपट्टी आकारली जात आहे. त्यामुळे संबंधितांकडून पाणीपट्टी भरण्यात येत नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. 

दरम्यान, ही थकबाकी वसूल व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाहणी करून नळजोड दुरुस्त करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र नळजोडदुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टी वसूल करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले नाही. या पार्श्‍वभूमीवर मीटरच्या दुरुस्तीसाठी मोहीम राबवून पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात बिले दुरुस्ती केली जाणार आहेत. त्यानुसार ती वसूल केली जातील. याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.