दुधाची गुणवत्ता तपासणी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

अन्न व औषध प्रशासन विभागाने १६ नमुने तपासणीसाठी पाठविले

पुणे - अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पिशव्यांमधील दुधाची गुणवत्ता तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. रात्री शहरात येणाऱ्या पिशव्यांमधील दुधाचे १६ नमुने घेण्यात आले असून, ते तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाने १६ नमुने तपासणीसाठी पाठविले

पुणे - अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पिशव्यांमधील दुधाची गुणवत्ता तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. रात्री शहरात येणाऱ्या पिशव्यांमधील दुधाचे १६ नमुने घेण्यात आले असून, ते तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

पुण्यात रोज सुमारे चार लाख लिटर दुधाची मागणी असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन पुण्यात होत नसल्याने शेजारील जिल्ह्यांमधून पुरवठा होतो. विविध डेअऱ्या पिशव्यांमध्ये दूध भरून त्या पिशव्या वाहनातून शहरात आणतात. या मार्गांवर दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्री केली व पिशव्यांतील दुधाचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत. 

सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ म्हणाले, ‘‘शहरात येणाऱ्या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी मोशी आणि लोणी काळभोर या ठिकाणी दूध पिशव्यांची तपासणी करण्यात आली. मोशी टोल नाका येथून दुधाचे आठ नमुने घेतले. रात्री नऊ ते दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.’’

सहायक आयुक्त संपत देशमुख म्हणाले, ‘‘सोलापूर रस्त्यावरून शहरात येणाऱ्या दुधाच्या चार वाहनांची तपासणी करून आठ नमुने घेण्यात आले.’’ अन्नसुरक्षा अधिकारी नीलेश खोसे, अजित मैत्रे, किरण जाधव, लक्ष्मीकांत जावळे, संतोष सावंत, नागवेकर, जेटके, भांडवलकर यांनी ही कारवाई केली. देवानंद वीर, गणपत कोकणे, विकास सोनवणे यांनी ही कारवाई केली.

असा होतो दूधपुरवठा 
शहरातील दुधाची मागणी मोठी असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या जवळच्या जिल्ह्यांसह नाशिक, उस्मानाबाद येथील कळंब येथून दुधाचा पुरवठा होतो. हे दूध त्या त्या ठिकाणच्या डेअरीमधून पिशव्यांमध्ये भरून वितरकांकडे येते. तेथून ते किरकोळ विक्रेते घराघरांत पोचवतात.

अशी केली कार्यवाही
मध्यरात्री वेगवेगळ्या मार्गांवर सापळा रचण्यात आला. दूध घेऊन शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर नमुने घेण्यात आले व ते तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, तपासणीसाठी थांबलेल्या वाहनातून कर्मचारी तातडीने इतर वाहनांमधील चालकाला धोक्‍याची सूचना देत असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

दुधाची गुणवत्ता म्हणजे काय?
दूध हा पोषक आहार आहे. त्यामुळे त्याची गुणवत्ता राखणे आवश्‍यक असते. फॅट आणि ‘सॉलिड नॉट फॅट’चे प्रमाण योग्य असणे म्हणजे गुणवत्ता. गाईच्या दुधाची साडेतीन आणि म्हशीच्या दुधाची ६ फॅट असणे आवश्‍यक आहे. तसेच, गाईच्या दुधातही ‘सॉलिड नॉट फॅट’चे प्रमाण ८.५, तर म्हशीच्या दुधातही हे प्रमाण ९ असणे कायद्याने बंधनकारक केले आहे. दुधात फॅटचे प्रमाण कमी असल्यास त्यातून योग्य पोषणमूल्य मिळत नाही.