#MilkAgitation बंदोबस्तात दूधपुरवठा

नीरा (ता. पुरंदर) - बंदोबस्तात करण्यात येत असलेली दूध टॅंकरची वाहतूक.
नीरा (ता. पुरंदर) - बंदोबस्तात करण्यात येत असलेली दूध टॅंकरची वाहतूक.

पुणे-सोलापूर महामार्गावर ५० टँकरला पोलिस संरक्षण
केडगाव - इंदापूर, दौंड, यवत, लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावरून जाणाऱ्या ५० दुधाच्या टॅंकरला संरक्षण दिले. त्यामुळे पाच लाख लिटर दूध पुणे शहरात सुखरूप पोचवले आहे. 

याबाबत यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले, ‘पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावरून जाणाऱ्या ५० दुधाच्या टॅंकरला संरक्षण दिले. पोलिसांमुळे पुण्यात पाच लाख लिटर दूध पोचले. या टॅंकरला इंदापूर, दौंड, यवत, लोणी काळभोर पोलिसांनी आपापल्या हद्दीत संरक्षण दिले. एका रांगेत हे टॅंकर पुण्यापर्यंत नेण्यात आले. पुढे पुणे शहर पोलिसांनी या टॅंकरला बंदोबस्त दिला. कोणताही अनुचित प्रकार न घडता ते पुण्यात पोचले.
फौजदार राहुल यादव म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्‍यातील दोन दूध संघांचे ४० टॅंकर; तर श्रीगोंदा तालुक्‍यातील १० टॅंकर पाटस टोल नाका येथे एकत्रित करण्यात आले. पाटसपर्यंत त्यांना इंदापूर पोलिसांनी बंदोबस्त दिला.

पाटसपासून लोणी पोलिस स्टेशनच्या हद्दीपर्यंत यवत पोलिसांनी बंदोबस्त दिला. पाटस टोल नाक्‍यात रात्री साडेदहा वाजता सर्व ५० टॅंकर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मध्यरात्री ते पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पुणे शहरात दूध पोचवण्यासाठी तीन पोलिस अधिकारी व ३० पोलिस कर्मचाऱ्यांनी महामार्गावर पहारा दिला. रविवारी मध्यरात्री १२ टॅंकर पोलिस बंदोबस्तात पुण्यात पोचविण्यात आले होते, असे पोलिस कर्मचारी गणेश झरेकर यांनी सांगितले. 

सूरज बंडगर म्हणाले, ‘‘कायदा आणि सुव्यवस्था राखणे आमचे कामच आहे. आंदोलनात दगड मारणे, गाड्या पेटविणे, हे प्रकार सोपे वाटतात. रागाच्या भरात आंदोलनकर्त्यांना भान राहत नाही. मात्र, आंदोलन शांत झाल्यानंतर केस चालू होते, तेव्हा कुणीही मदतीला येत नाही. ज्यांच्या नावे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, त्यालाच ते सर्वस्वी निपटावे लागते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेऊन कोणतेही गैरकृत्य करू नये.’’

पुुण्याला साताऱ्यातून पुरवठा
गुळुंचे - दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात दूध वाहतूक करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातून आलेले १० दुधाचे टॅंकर पुणे व बारामतीकडे बंदोबस्तात पोचविण्यात आले. 

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहिल्यास मोठ्या शहरांमध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दुधाचा तुटवडा होऊ नये यासाठी दुधाच्या टॅंकरला पोलिस संरक्षण देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातून आलेले पाच टॅंकर बारामती येथील दूध प्रक्रिया प्रकल्पाकडे तर पाच टॅंकर पुणे, मुंबईकडे पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे म्हणाले, की सरकार दुधाला दरवाढ देत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. पान २ वर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com