'त्या' दोन्ही मुलींचे मृतदेह मुळ-मुठा कालव्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास डबा आणण्याचे कारण सांगून त्या शाळेबाहेर पडल्या. रात्री उशीरापर्यंत दोन्ही मुली घरी परतल्याच नाहीत.

हडपसर : आठवीत शिकणाऱ्या विद्या कुमार भद्रे (वय १३, रा. अन्सारी फाटा, मांजरी, ता. हवेली, जी. पुणे) व वैष्णवी संतोष बिराजदार (वय १३) या दोन्ही बेपत्ता विद्यार्थिनींंचे मृतदेह हडपसर पोलिसांना जुन्या मुळा-मुठा कालव्यात सापडले. 

कालव्यावरील पाईपवरून या मुली नेहमीच घरी व शाळेत ये-जा करत. पाईपवरून पाय घसरून दोन्ही मुली कालव्यात पडून बुडाल्याचा प्राथमिक अंदाज हडपसर पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
विद्याचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या हातात 20 रुपयांची नोट आढळून आली. दोन्ही मुलींच्या अंगावर शाळेचे गणवेश आहेत.

आठवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली शाळेतून बेपत्ता झाल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुली साडेसतरा नळी येथील ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आल्या. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास डबा आणण्याचे कारण सांगून त्या शाळेबाहेर पडल्या. रात्री उशीरापर्यंत दोन्ही मुली घरी परतल्याच नाहीत. पालकांनी शोधाशोध केली, शाळेत, नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी रात्री उशिरा दोन्ही मुलींचे अपहरण केल्याची फिर्याद दिली होती. 

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. कालव्यावरील पाईपवरून ये-जा करताना पाय घसरून या मुली कालव्यात पडून बुडाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे. मुंढवा जॅकवेलचे पाणी या कालव्यात सोडण्यात आले आहे. शाळेपासून दोनशे मीटर अंतरावर वैष्णवीचा व त्यानंतर पुढे रॅडीएटर कंपनीजवळ विद्याचा मृतदेह मिळून आला.