‘एमएनजीएल’ गॅसवर!

‘एमएनजीएल’ गॅसवर!

मुदतीत खोदाई पूर्ण होत नसल्याने अडथळा

पुणे - सिलिंडरपेक्षाही स्वस्त दरात पाइपलाइनद्वारे मिळणाऱ्या गॅसचे बिल ग्राहकांना परवडणारे आहे. परंतु महापालिकेकडून खोदाईसाठी परवानगी मिळविण्यातच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) संघर्ष करावा लागत असल्याने मागणी असतानाही गॅस पुरवणे अशक्‍य बनले आहे. खोदाईसाठी दिलेल्या परवानगीची मुदत या महिनाअखेर संपत असल्याने त्यास आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ‘एमएनजीएल’ने महापालिकेकडे केली आहे.

शहरात पाइपलाइन टाकण्यासाठीच्या खोदाईचे काम मागील सहा महिने परवानगीविना रखडले होते. महापालिकेने मार्चमध्ये एप्रिलअखेरपर्यंत खोदाईची परवानगी दिली, मात्र या अल्पकाळात अपेक्षित खोदाई करणे अशक्‍य असून ही मुदत वाढवली तर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पाइपलाइन पोचवता येईल, असे ‘एमएनजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात गॅसचा पुरवठा करण्यासाठी ‘एमएनजीएल’ने पाच हजार किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्ट पूर्ण झाल्यास तीन लाख जोड (कनेक्‍शन) देणे शक्‍य होणार आहे. तसे नियोजनही कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पाचशे कि.मी. पर्यंतच पाइपलाइन टाकून झाली असून त्याचा लाभ पुणे शहरातील बावीस ते तेवीस हजार, तर पिंपरी- चिंचवडमधील अठरा हजार ग्राहकांना होत आहे. मुंबईमध्ये दहा लाखांहून अधिक ग्राहकांना पाइपलाइनद्वारे पारंपरिक गॅसचा पुरवठा होत असून, दरवर्षी ग्राहकांच्या संख्येत एक ते दीड लाखाने वाढ होत आहे. त्या तुलनेत पुण्यातील ग्राहकांची संख्या फारच कमी आहे.

तांबेकर म्हणाले, ‘‘या संदर्भात महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता शहरातील सर्वप्रकारची खोदाईची कामे तीस एप्रिलपर्यंत थांबविण्यात येतात. मात्र, अत्यावश्‍यक सेवेसाठी खोदाईची परवानगी हवी असल्यास ती अतिरिक्त आयुक्तांकडून घेणे आवश्‍यक आहे, असे सांगितले जाते.’’

पुणे महापालिकेने वर्षभरासाठी खोदाईची परवानगी द्यायला हवी, तरच अधिकाधिक ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. मागील सहा महिने परवानगीच मिळाली नाही. येणाऱ्या पावसाळ्यात खोदाई करता येणार नाही. त्यामुळे जवळ जवळ एक वर्ष काम रखडल्यासारखीच परिस्थिती आहे. शहरात पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा झाल्यास, ग्रामीण भागात सिलिंडरचा पुरवठाही अधिक होऊ शकेल. महापालिकेने याचा विचार करायला हवा.
- ए. एम. तांबेकर, व्यवस्थापकीय संचालक, ‘एमएनजीएल’

पूर्ण झालेली कामे अन्‌ उद्दिष्ट
‘एमएनजीएल’ने दिलेली गॅस कनेक्‍शन : ५० हजार
(पुणे, पिंपरी- चिंचवड)
आतापर्यंत ५०० किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण
पाच हजार किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे उद्दिष्ट
प्रतिवर्षी टाकली जाते २०० ते २५० किलोमीटर पाइपलाइन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com