उद्योगांसाठी ‘मोस्ट’ प्रणाली सर्वोत्कृष्ट - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

 पुणे - ‘परदेशातील बलाढ्य उद्योगांशी स्पर्धेप्रमाणेच भारतीय उद्योगास उत्पादकता वाढीचा मंत्र देऊन सुदृढ बनण्यास मदत करण्यासाठी मेनार्ड ऑपरेटेड सिक्वेन्स टेक्‍निक (मोस्ट) प्रणाली सर्वोत्कृष्ट आहे,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी नुकतेच केले.

कोथरूड येथील यूमास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘सकाळ प्रकाशन’च्या वतीने प्रसिद्ध केलेल्या ‘मोस्ट-मंत्र सर्वोत्तम उत्पादन क्षमतेचा’ या पत्रकार उद्धव भडसाळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

पवार म्हणाले, ‘‘वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योगांना किफायतशीर उत्पादनाचे विविध पर्याय स्वीकारून प्रगतीसाठी प्रयत्न करावे लागतात, ‘मोस्ट’सारख्या उद्योगोपयोगी प्रणालीच्या प्रसारासाठी कामगार आणि व्यवस्थापनाप्रमाणेच इतर सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.’’ 

मोस्ट प्रणालीचा वापर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांतील कामगार आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची या वेळी झालेल्या ‘मोस्ट’विषयक चर्चासत्रात भाग घेतला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या नाशिक व इगतपुरी युनिटचे उपाध्यक्ष हिरामण आहेर म्हणाले, ‘‘उत्पादन नियोजनासाठी आवश्‍यक आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी ‘मोस्ट’ ही उत्तम प्रणाली आहे, तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कामगार आणि व्यवस्थापनात सकारात्मक भावना हवी.’’ वाढत्या स्पर्धेच्या काळात उद्योग टिकण्यासाठी खर्च कपात ही आवश्‍यक बाब आहे, त्यासाठी मोस्ट प्रणाली उपयुक्त असल्याचे टाटा मोटर्समधील मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख गजेंद्र चंदेल यांनी नमूद केले.  

ब्ल्यू स्टार कंपनी उत्पादन विभागाचे प्रमुख गिरीश पारुंडेकर म्हणाले की, कामगारांना विश्‍वासात घेऊन कंपनीने मोस्ट प्रणालीची अंमलबजावणी केल्याने कंपनीने प्रगती केली आहे.

मोस्ट प्रणालीमुळे कामगारांच्या सहकार्याने सतत उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करणे शक्‍य होत असल्याने आपोआप उत्पादनवाढीकडे वाटचाल होत असल्याचे असेंचर मॅनेजमेंट कन्सल्टिंग ग्रुपचे भागीदार राजेंद्र देशपांडे यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेमुळे उत्पादन खर्चात कपात करणे अपरिहार्य असल्याने कामगार नेत्यांनाही आपल्या भूमिकेत बदल करणे आवश्‍यक बनल्याचे महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील कामगार नेते राजीव सावने यांनी सांगितले.

‘सिमेन्स’सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमधील व्यवस्थापनाने कामगार संघटनेशी समन्वयाची भूमिका घेत ‘मोस्ट’प्रणालीची अंमलबजावणी केल्याने अल्पावधीत ती कामगारांनी अंगीकारली आणि त्याचे यशस्वी परिणाम दिल्याचे कामगार नेते गिरीश अष्टेकर यांनी स्पष्ट केले.
कामगार नेते डॉ. भालचंद कानगो म्हणाले, ‘‘कामगारांनी नवीन बदल सकारात्मक भूमिकेतून स्वीकारावेत, यासाठी व्यवस्थापनानेही संघटनेस विश्‍वासात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे’’.

नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना व्यवस्थापनाने कामगारांच्या श्रमांची तीव्रता आणि शारीरिक परिणाम विचार करण्याची गरज ‘व्हीआयटी’मधील संशोधक डॉ. श्रीराम साने यांनी व्यक्त केली. व्यवस्थापन सल्लागार अरविंद श्रोत्री म्हणाले, ‘‘व्यवस्थापनाने योग्य पद्धतीने रीती आणि नीती अंगीकारून नवीन तंत्रांची अंमलबजावणी केल्यास प्रगती निश्‍चित आहे.’’ यूमास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक बडवे यांनी प्रास्ताविकात गेल्या दहा वर्षांत साडेतीनशेहून अधिक कंपन्यांत मोस्ट प्रणालीचा यशस्वीरीत्या प्रसार केला असून सौदी अरेबिया, पाकिस्तान, दुबई, थायलंडसारख्या देशापर्यंत कंपनी पोहोचल्याचे सांगितले.