मोटारींच्या प्रतिकृतींचे आता संग्रहालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

रत्नाकर जोशी यांचा मानस; मर्सिडीज, जग्वार, बीएमडब्ल्यूसह १२५ गाड्या

पुणे - मोटारीची आवड कोणाला नसते? अगदी काहीतरी समज आलेल्या लहान मुलापासून आजोबांपर्यंत प्रत्येकाचे मोटारीबद्दल आकर्षण लपून राहत नाही. त्यातच त्यांच्या विशेष आवडीची गाडी मिळाली तर आनंद गगनात मावत नाही. नेमका हाच छंद पर्वती, लक्ष्मीनगर येथे रत्नाकर जोशी यांनी जोपासला आहे. गेली २७ वर्षे हा छंद जोपासत त्यांनी मोटारींच्या प्रतिकृती जमविल्या आहेत.याचे संग्रहालयात रूपांतर करण्याचा मानसही जोशी यांनी बोलून दाखविला.  

पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून निवृत्त झालेल्या जोशी यांची मोटारींची दुनिया निराळीच आहे. त्यात काडेपेटीच्या आकारापासून तीन फूट लांबीच्या मोटारींच्या प्रतिकृती आहेत. त्यांच्या संग्रहात १९२३ सालच्या फोर्ड बनावटीच्या ट्रकपासून सध्याच्या ‘बीएमडब्ल्यू’पर्यंतच्या गाड्यांच्या प्रतिकृती आहेत. मर्सिडीज बेंझ, हमर, कुपर, फेरारी, जग्वार, ऑडी अशा परदेशी बनावटीच्या कार तर आहेतच; पण मारुती, हिंदुस्थान मोटर्स, महिंद्रा, टाटा या भारतीय बनावटीच्या कारही या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. जोशी यांच्या संग्रहात १२५ मोटारींच्या प्रतिकृती आहेत. त्यात ७५ परदेशी बनावटीच्या आणि ५० भारतीय कंपन्यांनी विकसित केलेल्या मोटारींचा समावेश आहे.हा संग्रह अजून अपूर्ण आहे. यात आणखी बऱ्याच मोटारींच्या प्रतिकृती समाविष्ट करायच्या आहेत. 

लहानपणी आपण सगळेच खेळण्यातल्या गाड्यांशी खेळलेलो असतो. अशा मोटारींच्या प्रतिकृती १९८६ पासून संकलित करू लागलो. त्या वर्षी मला मर्सिडीज बेंझ या गाडीची प्रतिकृती मिळाली. तेव्हापासून दिवाणखान्यात पार्किंगच्या जागेत वेगवेगळ्या वाहनांच्या प्रतिकृती आणून पार्क करत आहे.
- रत्नाकर जोशी