घोरपडीत चेंबर खाली, रस्ता वर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंढवा - घोरपडीतील रस्त्यातील ड्रेनेजच्या चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत नसल्याने ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. या खोलगट भागात दुचाकी आदळल्याने हॅंडलवरचा ताबा सुटून अपघात होत आहेत. पालिकेने यात लक्ष घालून रस्ता समपातळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

घोरपडी येथील शिर्के कंपनी ते थोपटे चौक व रेल्वे उड्डाण पूल दरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटर रस्त्यावर ड्रेनेज विभागाकडून सुमारे सहा फूट व्यासाच्या पावसाळी गटारांचे काम सुरू केले आहे. शिर्के ते भारत फोर्ज कंपनीदरम्यान काम पूर्ण होऊन ठेकेदाराने सहा बाय चारची सुमारे तीस लोखंडी झाकणे ड्रेनेजवर बसविली आहेत. रस्त्यावर डांबर टाकून रस्ता तयार केला आहे. ती झाकणे रस्त्याच्या समपातळीत नसल्याने, झाकणे सहा इंच खोल जाऊन काही ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामध्ये पडून दुचाकीस्वारांना अपघात होत आहे.  

थोपटे चौक ते शिर्के कंपनी दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जनतेच्या पैशातून पालिकेने जे कोट्यवधी खर्चून लाइन टाकली, त्या रस्त्यांच्या दर्जाचे काय, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या ड्रेनेज व रस्त्याची कामे कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाची केली आहेत. या कंत्राटदारांची चौकशी करून, त्याच्याकडून पुन्हा रस्त्यावर दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.