ठिपकेदार मुनियाची घरटी बांधण्याची लगबग

ठिपकेदार मुनियाची घरटी बांधण्याची लगबग

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - पक्ष्यांचं जग मोठं रमणीय. आकाशात विहरणारं स्वच्छंद आयुष्य. मात्र अशा आयुष्यालाही विसावणारं घरकूल हवं असतं. पक्ष्यांची घरटी हा कलाकुसरीचा अत्यंत सुंदर नमुना असतो. काडी काडी जमवून पक्षी स्वतः ही कलाकुसर करून ऊन-पावसापासून रक्षण करणारं घरटं बांधतात. किंबहुना, पक्ष्यांची घरटी पाहणं, हा सुंदर अनुभव असतो. असाच अनुभव सध्या तळेगावमधील पक्षिप्रेमी घेत आहे. अत्यंत देखण्या अशा ठिपकेदार मुनिया या पक्ष्यांचा घरटी बांधणीचा काळ सुरू झाला असून, त्यांची त्यासाठीची लगबग पाहायला मिळत आहे. 

तोंडात गवताचे पान धरून उडणारे हे पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, त्याचा मंजूळ आवाजही सुखद अनुभव देत आहे. झाडाझुडपांत राहणाऱ्या या पक्ष्यांचा निवारा वृक्षतोडीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे मानवी वस्तीत कधी पत्र्याच्या शेडखाली, तर कधी बांधकामांच्या सांधीकोपऱ्यात घरटे विणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. स्वाभाविकच आतापर्यंत दुर्मीळ असणारे त्यांचे दर्शन सहजरीत्या होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांची घरटे बांधण्याची लगबगही पाहायला मिळत आहे.

मुनिया हा साधारण १० सेंटिमीटर आकारमानाचा व चिमणीसारखा दिसणार पक्षी. भारतात सर्वत्र आढळणारा हा पक्षी हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचा रंग गडद तपकिरी असून, पंखांवर व पोटावर काळे-पांढरे ठिपके असतात. म्हणूनच याचे नाव ठिपकेदार मुनिया पडल्याचे पक्षितज्ज्ञ सांगतात.

थव्याने राहणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्ये आहे. एकाच परिसरात अनेक जण आपली घरटे बांधून राहतात. जुलै ते ऑक्‍टोबर हा मुनियांच्या विणीचा काळ असतो. मादी एका वेळी शुभ्र पांढऱ्या  रंगाची चार ते आठ अंडी देते. नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, त्यांना खाऊ घालणे व घरट्याचे संरक्षण करणे आदी कामे करतात.

सध्या रानोमाळ गवत वाढले आहे. गवताचे पान चोचीत धरून घरट्याकडे उडत जाणाऱ्या या पक्ष्याला पाहणे नागरिकांसाठी वेगळाच अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com