काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच प्रमुख लढत

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच प्रमुख लढत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसमध्ये चुरस असलेल्या हडपसर परिसरातील रामटेकडी-सय्यदनगर (क्र.२४) हा प्रभाग नव्या रचनेत त्रिसदस्यीय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांच्या जुन्या प्रभागांचा बहुतेक भाग नव्या प्रभागात आला आहे. हा प्रभाग तीन सदस्यांचा असला तरी, सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची यादी मोठी आहे. त्यामुळे उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक एकाच प्रभागातून लढण्यास इच्छुक असल्याने त्यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे.  

नव्या प्रभागरचनेतील रामटेकडी-सय्यदनगर प्रभागात दोन जागा खुला आणि अनुसूचित जाती गटासाठी तर, एका जागेवर मागास प्रवर्गाचे (महिला) आरक्षण आहे. लोकसंख्येनुसार या प्रभागाची रचना केली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या हडपसर गावठाण-वैदुवाडी (क्र.४२) आणि रामटेकडी-वानवाडी (क्र.४६) या प्रभागांचा बहुतेक भाग नव्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. 

या जुन्या प्रभागांधील दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन जागा काँग्रेसकडे आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद अलकुंटे, विजया कापरे, काँग्रेसचे सतीश लोंढे, कविता शिवरकर यांचा समावेश आहे. नव्या रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फारुख इनामदार यांच्या प्रभागातील काही भाग जोडला आहे. बदलेली प्रभागरचना लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यूहरचना आखली असली तरी, या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होण्याचा अंदाज आहे. 

जुन्या प्रभागातील वैदुवाडी आणि रामटेकडीचा भाग नव्या प्रभागात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक आणि ‘पीएमपी’चे संचालक आनंद अलकुंटे आणि याच पक्षाचे नगरसेवक फारुख इनामदार उत्सुक आहेत. विद्यमान नगरसेवकांसह पक्षात अनेक जणांकडे नागरिकांचा मागास प्रवर्गाचे (ओबीसी) जातप्रमाणपत्र असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. महिलेसाठी राखीव असलेल्या जागेसाठी काही जण आग्रही आहेत. अलकुंटे आणि इनामदार हे दोघे खुल्या गटातून इच्छुक असल्याने उमेदवारीवरून त्यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे.  
रामटेकडी-वानवडी या जुन्या प्रभागातील बहुतेक भाग नव्या प्रभागात आल्याने काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सतीश लोंढे यांच्यासह नगरसेविका विजया वाडकर या उत्सुक आहेत. वाडकर यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत येत आहेत. भाजपकडूनही इच्छुक मोठ्या संख्येने आहेत, तर मनसे-शिवसेनेच्या इच्छुकांनी बाह्या सरसावल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com