पालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही. डेंगी, मलेरियासारखे आजार नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिका प्रशिक्षित कर्मचाऱ्यांऐवजी दरवर्षी कंत्राटीपद्धतीने कर्मचारी नियुक्त करीत आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अपुरे मनुष्यबळ हा नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांतही आरोग्य सुविधा पुरवावी लागणार असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर ताण येईल आणि त्याचा सेवेवर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्याच्या कालावधीत डेंगी, मलेरिया यांसारख्या आजाराचा प्रार्दुभाव वाढतो. डासांमुळे या आजाराचा संसर्ग होत असल्याने त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्‍यक आहेत. आरोग्य विभागाकडे 513 मान्यता प्राप्त पदे असून, त्यापैकी 231 पदे रिक्त आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी 350 कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर घेतले जातात. या कर्मचाऱ्यांना डास अळी निर्मूलनाविषयी तेवढे ज्ञान नसते. महापालिकेचे अधिकारी सांगतील त्या ठिकाणी जाऊन औषध फवारणीचे काम ते करतात. मलेरिया सर्वेक्षण निरीक्षकाच्या नऊ, मलेरिया निरीक्षकाच्या 39 आणि मलेरिया सर्वेक्षण कर्मचाऱ्यांच्या सात जागा रिक्त आहेत. या संदर्भात सहायक वैद्यकीय अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्या, ""आरोग्य विभागाकडे तांत्रिक ज्ञान असलेल्या मनुष्यबळाची कमतरता आहे. पावसाळ्यात आजार फैलावल्यानंतर आरोग्य विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तांत्रिक ज्ञान असलेल्या मनुष्यबळाची भरती करावी, अशी मागणी सातत्याने केली आहे.'' 

Web Title: The Municipal Health Department does not have trained manpower