बारामतीत सराईत गुन्हेगाराचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

बारामती शहर - शहरातील सराईत गुन्हेगार अक्षय ऊर्फ छोटा विमल कांतिलाल जमदाडे (वय 20, रा. जळोची, ता. बारामती) याची गुरुवारी (ता. 28) रात्री डोक्‍यात लाकडी दांडके मारून खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय असून या प्रकरणी नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बारामती शहर - शहरातील सराईत गुन्हेगार अक्षय ऊर्फ छोटा विमल कांतिलाल जमदाडे (वय 20, रा. जळोची, ता. बारामती) याची गुरुवारी (ता. 28) रात्री डोक्‍यात लाकडी दांडके मारून खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय असून या प्रकरणी नऊ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जळोची परिसरातील बैलबाजारा नजीक माळी चौकात हा खून झाला. अक्षय जमदाडे व त्याचा मित्र दीपक धर्मे हे दोघे मोटारसायकलवरून निघाले असताना आमच्या घरावर दगडफेक का करतोस, असा जाब त्याला काही जणांनी विचारला. मात्र, आपण दगडे टाकलेली नाहीत तरीही मला जबाबदार का धरता असे म्हणत तुमच्याकडे बघून घेईन, असे अक्षय याने म्हटल्यावर जाब विचारायला आलेल्या लोकांमध्ये मारामारी सुरू झाली. या वेळी लाकडी दांडके व पाइपने अक्षयच्या डोक्‍यात जोरदार वार करण्यात आले. तसेच, त्याच्या संपूर्ण शरीरावर जबर मारहाण करण्यात आली. 

दरम्यान, या भांडणाचा आवाज ऐकून अक्षयचे वडील कांतिलाल म्हस्कू जमदाडे हे भांडणे सोडविण्यास आले. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आली. दीपक धर्मे यालाही मारहाण झाली. जखमी अवस्थेतील अक्षय जमदाडे यास दवाखान्यात नेल्यावर त्याला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अविनाश हौसराव देवकाते, हौसराव देवकाते, दत्तू गोफणे, सत्यवान ऊर्फ बगळ्या गोफणे, आबा ढाळे, दादा देवकाते, विकास ऊर्फ नाना मलगुंडे, योगेश गोफणे, प्रवीण गोफणे यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू केला आहे. अक्षयचे वडील कांतिलाल जमदाडे यांनी फिर्याद दिली आहे. फौजदार सुभाष मुंडे व पोलिस कर्मचारी अविनाश दराडे तपास करीत आहेत. 

अक्षय जमदाडेवर अनेक गुन्हे 
अक्षय जमदाडे याच्याविरुद्ध बारामती शहर बारामती तालुका पोलिस ठाण्यासह शेजारील जिल्ह्यातही चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते, असे पोलिसांनी सांगितले. अक्षय याच्या खुनाच्या निषेधार्थ काही युवकांनी भिगवण चौकात सकाळी अचानक रास्ता रोकोचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस वेळीच घटनास्थळी आल्याने सदर युवक तेथून निघून गेले. 

Web Title: murder of criminals in baramati