‘व्हॉट्‌सॲप’मुळे मिळाली खुन्याची ‘टीप’

अनिल सावळे
शुक्रवार, 31 मार्च 2017

नगर-पुणे रस्त्यावर बेवारस बॅगेत तरुणीचा मृतदेह होता. या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. पोलिसांनी अविरत परिश्रम घेत आणि सोशल मीडियाचा कौशल्याने वापर करीत आरोपीला जेरबंद केले. 

नगर-पुणे रस्त्यावर बेवारस बॅगेत तरुणीचा मृतदेह होता. या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. पोलिसांनी अविरत परिश्रम घेत आणि सोशल मीडियाचा कौशल्याने वापर करीत आरोपीला जेरबंद केले. 

१ रविवार, २९ जून २०१४. सायंकाळचे पाच वाजले होते. येरवडा पोलिस ठाण्यातील फोन खणखणला. पोलिस नियंत्रण कक्षातून कॉल होता. नगर-पुणे रस्त्यावरील एका ऑटोमोबाइल्स सर्व्हिस सेंटरसमोर लाल रंगाची बेवारस रेक्‍झिन बॅग आढळून आल्याची खबर होती. ही बाब शिवराणा पोलिस चौकीतील बीट मार्शलला कळविण्यात आली. येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि बीट मार्शल घटनास्थळी रवाना झाले. बॅग आकाराने मोठी आणि कुलूपबंद होती. बॅगमध्ये बाँब आहे की काय, याची खात्री करून घेण्यासाठी बाँब शोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाला बोलावण्यात आले. बॅगला निलगिरी तेलाचा वास येत होता. बॅग उघडल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. त्यात १८ ते २० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह होता. दोन्ही गुडघे पोटाजवळ दुमडून मृतदेह बॅगेत ठेवला होता. निळ्या रंगाची जिन्स पॅंट आणि हिरवट गुलाबी रंगाचा नक्षीकाम केलेला टॉप असा पेहराव होता. मानेची उजवी बाजू काळी पडली होती. या तरुणीची ओळख पटणार नाही, याची आरोपीने खबरदारी घेतली होती. पोलिसांनी बॅग आणि मृतदेहाचा पंचनामा केला. पोस्टमार्टेमनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीचा गळा दाबून खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला. 

२      कोण होती तरुणी?
परिमंडळ चारचे तत्कालीन पोलिस उपायुक्‍त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पहिल्यांदा त्या तरुणीची ओळख पटविणे आवश्‍यक होते. पाटील यांनी तपास पथकाचे सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम तयार केल्या. तरुणीचे फोटो आणि वर्णनाची माहिती तयार करून व्हॉट्‌सॲप ग्रुपवर पाठविली. तिचे पोस्टर्स तयार करून कॉलेज, आयटी कंपन्या, हॉस्टेल, लॉजेस, पेइंग गेस्ट हाउस अशा ठिकाणी लावण्यात आले. पोलिसांच्या या कष्टाला आठ दिवसांनी यश आले. व्हॉट्‌सॲप ग्रुपवरील मेसेज पाहून कॅम्प परिसरातील वेस्टएन्ड थिएटरजवळ असलेल्या एका लेडिज वेअर दुकानातील तिच्या ओळखीच्या महिलांनी लष्कर पोलिस ठाणे गाठले. लष्कर पोलिसांनी ही बाब येरवडा पोलिसांना कळविली. 

३ अखेर ओळख पटली
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे आणि सहायक निरीक्षक जाधव यांनी खातरजमा केली. त्या तरुणीचे नाव अनुराधा कुलकर्णी असून मूळची लातूर येथील आहे. ती लातूरच्या प्रशांत सूर्यवंशी या तरुणासोबत घोरपडी भागात राहते. ती दुकानात सेर्ल्स गर्ल असून, प्रशांत रिक्षा चालवितो. २८ जूनच्या रात्री ती प्रशांतसोबत रिक्षातून गेली होती. प्रशांतने २९ जून रोजी तिच्या मैत्रिणीला फोन करून अनुराधा बहिणीला भेटण्यासाठी लातूरला गेल्याचे सांगितले. तिच्या मॅनेजरकडून शिल्लक पगार दे, असे बोलणे झाले होते. 
 

४    ‘त्याच्या’साठी सापळा
अनुराधाच्या मैत्रिणीमार्फत प्रशांतला फोन करून तिचा पगार नेण्यासाठी ये, असा निरोप दिला. मात्र तो येत नव्हता. कॉल डिटेल्स आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तो नाशिक परिसरात असल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी सहायक निरीक्षक जाधव, पोलिस नाईक तुषार आल्हाट, प्रदीप शेलार आणि हरिश मोरे यांचे पथक रात्री नाशिककडे रवाना केले. तसेच, पोलिस नाईक यशवंत खंदारे, सतीश शिंदे यांची दुसरी टीम हडपसर, जेजुरी परिसरात आरोपीच्या नातेवाइकांची माहिती काढण्यासाठी पाठविली. खंदारे यांच्या पथकाने आरोपीच्या एका नातेवाइकाकडे ट्रक असून, तो पुणे-वापी (गुजरात) दरम्यान व्यवसाय करीत असल्याची माहिती काढली. त्याआधारे जाधव यांचे पथक सकाळ वापी येथे पोचले. 

५ ‘होय, मीच केला खून...!’
महाराष्ट्रातून येणारे ट्रक कोठे थांबतात, याची ते माहिती घेत होते. त्या वेळी आरोपी हा बडोदा येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने बडोदा-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्रातील ट्रक कोठे थांबतात, याचा शोध घेतला. सायंकाळी दर्जीपुरा भागात हायवेलगत प्रशांतच्या नातेवाइकाचा ट्रक लागल्याचे दिसले. जाधव आणि कर्मचारी परिसरात दबा धरून बसले. तेवढ्यात प्रशांत हातपंपावरून आंघोळ करून येत होता. दबा धरून बसलेल्या जाधव यांनी प्रशांत येत असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांना केला. तो ट्रकचा दरवाजा उघडत असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. प्रशांतने आढेवेढे न घेता गुन्ह्याची कबुली दिली. अनुराधावर आपले प्रेम होते. परंतु, ती मोबाईलवर सतत दुसऱ्याशी बोलत असल्याच्या संशयावरून तिचा गळा दाबून खून केल्याचे त्याने सांगितले. तपासपथकाने आरोपीला ताब्यात घेतले आणि बडोद्यावरून पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला.

Web Title: murderer hint by whatsapp