कचराकोंडीला आपण किती जबाबदार?

नंदकुमार सुतार
सोमवार, 8 मे 2017

कचऱ्याच्या मुद्द्याकडे सर्वच घटकांची डोळेझाक

शहरी भागातील नागरिकांच्या आयुष्यात अशाप्रकारे कचरा भरून गेला आहे; मात्र ते संकट असल्याची जाणीव तोपर्यंत होत नाही, जोपर्यंत सोसायटी सफाईवाला तुमचे कचऱ्याचे डबे घेऊन जात नाही किंवा शेजारच्या कोपऱ्यावरून नाक धरून पळावे लागत नाही. याला कोणीही अपवाद नाही. म्हणजे गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव कचऱ्याच्या बाबतीत नाही.

पुणे : "मेक इन इंडिया'चे वारे वाहू लागले, तेव्हा एका मित्राने घरातल्या वस्तूंची यादी केली आणि दररोज लागणाऱ्या वस्तूंपैकी अस्सल देशी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विदेशीचा वास लागलेल्या किती वस्तू आहेत, याचे वर्गीकरण केले असता त्याला धक्काच बसला. कारण, नव्वद टक्के वस्तू एक तर विदेशी किंवा विदेशीचा गंध असलेल्या निघाल्या. ब्रश-टूथपेस्टपासून ते परफ्यूमपर्यंत साऱ्यांनाच विदेशी गंध आढळून आला. कपडे अन्‌ खाण्यापिण्याच्या वस्तूंतही विदेशी दरवळ अनुभवला. (रामदेवबाबांची टूथपेस्ट अलीकडे आलेली आहे.) कचऱ्याचे असेच आहे. बाहेरचा कचरा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपण घरात कसा आणतो, याची सकाळी उठल्यापासून यादी केली, तर तुम्हालाही धक्का बसेल.

छोट्या सोनमचे पप्पा सकाळी उठले, तेव्हा पेस्ट संपलेली दिसली. ती विकत आणली, तेव्हा ती एकटी नव्हती, तिच्यासोबत आकर्षक खोके होते. पप्पांनी टूथपेस्ट बाहेर काढताक्षणी ते खोके फेकून दिले. चहा संपल्याने सोनमच्या आईने पटकन जाऊन चहा पावडर आणली. घरात येताच पावडर डब्यात ओतून घेतली आणि खोके फेकून दिले. सोनम, सम्यक आणि आई-बाबांची अशी यादी संध्याकाळपर्यंत लांबली, तेव्हा घराची गॅलरी खोके, प्लॅस्टिक बॅगा, आवरणाचे चमचमते कागद अशा नाना वस्तूंनी भरून गेली. त्यात फूड पॅकेटसारख्या वस्तूही असणारच. या साऱ्या वस्तू घरात येताच मुख्य वस्तूपासून बाजूला जाऊन पडल्या होत्या. आपण नकळतपणे घराची कचराकुंडी करतोय याचे भान कोणालाही नव्हते.

शहरी भागातील नागरिकांच्या आयुष्यात अशाप्रकारे कचरा भरून गेला आहे; मात्र ते संकट असल्याची जाणीव तोपर्यंत होत नाही, जोपर्यंत सोसायटी सफाईवाला तुमचे कचऱ्याचे डबे घेऊन जात नाही किंवा शेजारच्या कोपऱ्यावरून नाक धरून पळावे लागत नाही. याला कोणीही अपवाद नाही. म्हणजे गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव कचऱ्याच्या बाबतीत नाही. उलट गरिबाघरचा कचरा कमी आणि श्रीमंताघरचा जास्त. पुणे महापालिकेचेच नव्हे, तर जागतिक बॅंकेचीही आकडेवारी हेच सांगते. प्रगत राष्ट्रांमध्ये किंवा गरीब राष्ट्रांमध्ये दोन्हीकडे श्रीमंत वस्त्या अधिक कचरा करत असल्याचे आकडेवारी सांगते. युरोपमध्ये हे प्रमाण दरडोई तीन किलोपर्यंत जाते, तर पुण्यात श्रीमंतांच्या वस्त्या रोज दरडोई सातशे ते आठशे किलोग्रॅम कचरा करतात. याउलट गरीब वस्त्यांमध्ये दरडोई रोज तीनशे ते चारशे किलोग्रॅम कचरा होतो. हे नक्की की जाणीवपूर्वक कुणीही कचरा निर्माण करत नाही. प्रत्येकाच्या लाइफस्टाइलनुसार कचरा कमी-अधिक होत असतो.

कचरा प्रश्‍नाला अनेक कंगोरे आहेत. तो विषय राजकीय, सामाजिक आहेच, शिवाय तांत्रिकदेखील आहे. या तिन्हींचे काय व्हायचे ते होईल, किंबहुना काय होते हे आपण पाहतच आहोत. याव्यतिरिक्त तुमची-आमची थेट जबाबदारी काय आहे, हे तर आपण तपासले पाहिजे की नाही? घराबाहेरचा कचरा वेगळ्या आवरणाखाली आपल्या घरी आपण स्वत:हून सन्मानाने घेऊन येतो, तोच पुन्हा बाहेर टाकून देतो. जरासा बारकाईने विचार केला असता, तुमच्या-आमच्या सहज लक्षात येईल, की अशा अनेक वस्तू आहेत की ज्याबरोबर कचरा काहीही गरज नसताना तुमच्या घरात येऊन पडतो. नागरीकरणाच्या प्रचंड रेट्यामध्ये आता अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे.

कचरा प्रश्‍न स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्रशासनाचा नसून आपणा सर्वांचा आहे, ही जाणीव निर्माण होण्याची गरज आहे. स्वयंपाकाबरोबर निर्माण होणाऱ्या कचऱ्याला पर्याय नाही; मात्र त्यातही विचार केल्यास हा "ऑर्गनिक' कचरादेखील कमी होऊ शकतो. नाव कचरा; पण त्यामुळे भीषण समस्या निर्माण होत आहेत. कारण, या प्रश्‍नाकडे सर्वांचीच डोळेझाक झालेली आहे. एखादी सोसायटी किंवा घर असेल, तर वीज, पाणी अशा बाबींना प्राधान्यक्रम मिळतो आणि कचरा राहतो दुर्लक्षित. स्थानिक स्वराज्य संस्थांचेही तसेच आहे; परंतु कचरा कमी करणे आणि याबाबतची शिस्त सर्वांच्या अंगी बाणवल्यास अशी समस्या सोडवण्यास काही तरी हातभार लागेल. विदेशात कचरा भरपूर होतो; पण त्यांच्याकडे त्याची विल्हेवाट लावण्याची शिस्त आणि तंत्रज्ञानही आहे. आपल्या जगण्याचा कचरा व्हायचा नसेल, तर या प्रश्‍नाकडे डोळसपणे बघू या!

Web Title: nandkumar sutar writes on responsibility for garbage