सदोष ईव्हीएमचा आरोप राष्ट्रवादीला मान्य?

- मिलिंद वैद्य
रविवार, 5 मार्च 2017

तब्बल आठ टक्के मते वाढली; सत्ता मिळवूनही भाजप जैसे थे 
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता मिळवूनही भाजपची टक्केवारी गेल्या तीन वर्षांत वाढलेली नाही. उलट निवडणुकीसाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) सदोष असल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची टक्केवारी तब्बल आठ टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

तब्बल आठ टक्के मते वाढली; सत्ता मिळवूनही भाजप जैसे थे 
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता मिळवूनही भाजपची टक्केवारी गेल्या तीन वर्षांत वाढलेली नाही. उलट निवडणुकीसाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) सदोष असल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची टक्केवारी तब्बल आठ टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

वाढलेली टक्केवारी त्यांना मान्य असेल, तर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक चुका असल्याचा त्यांचा आरोप मागे घ्यावा लागणार आहे; अन्यथा वाढलेली टक्केवारी त्यांना अमान्य करावी लागणार आहे. उलट सत्ता मिळवणाऱ्या भाजपला गेल्या विधानसभा  निवडणुकीपेक्षा एक टक्काही मते वाढली नाही.

निवडणूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या वेळी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात मिळून एकूण सहा लाख ७० हजार ७२६ मतदान झाले होते. या वेळी सात लाख ७७ हजार ६६६ मतदान झाले. या वेळी एकूण मतदानात १० टक्के वाढ झाली आहे; पण नवीन मतदार आपल्याकडे खेचण्यात भाजपला अजिबातच यश मिळाले नाही. भाजपला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्या वेळच्या एकूण मतदानाच्या ३७ टक्के म्हणजे दोन लाख ५० हजार मते मिळाली होती. या वेळी दहा टक्के मतदान वाढले तरी भाजपला या वेळच्या एकूण मतदानापैकी दोन लाख ८८ हजार २६५  इतकेच म्हणजे ३७ टक्केच मतदान झाले. याचा अर्थ एकूण मतदानात जी दहा टक्के वाढ झाली ते मतदान आपल्याकडे वळविण्यात भाजपला अपयश आले. भोसरीचे आमदार महेश लांडगे, आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करूनही पक्षाला नवे मतदार आपल्याकडे वळवता आले नाहीत. त्यामुळे सत्ता मिळवूनही भाजपच्या मतांमध्ये कोणतीच वाढ झालेली नाही.

विधानसभेच्या वेळी चिंचवड मतदारसंघात भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना एक लाख ७६ हजार मते मिळाली होती. तर भोसरी व पिंपरी (भाजप-रिपाइं) अशा दोन्ही मतदारसंघांत मिळून भाजपला ७५ हजार मते मिळाली होती.

तसेच या निवडणुकीत वापरलेली ईव्हीएम सदोष असल्याचा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करीत आहे. त्यांना या वेळी आठ टक्के म्हणजे एकूण मतदानापैकी भाजपच्या खालोखाल दोन लाख २२ हजार १६४ मते मिळाली आहेत. २०१४ च्या विधानसभेला त्यांना त्या वेळच्या एकूण मतदानाच्या २०.२० टक्के म्हणजे एक लाख ३५ हजार ५२५ मते मिळाली होती. या वेळी त्यांना ८६ हजार ६३९ मते जास्त मिळाली आहेत. इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा ही मते सर्वाधिक आहेत.

ईव्हीएममध्ये बिघाड होता, असे मान्य केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आठ टक्के अधिकच्या मतांमध्येही गडबड आहे, असे मान्य करावे लागेल. राष्ट्रवादीला त्यांच्या मतांची झालेली वाढ मान्य असेल, तर ते करत असलेला आरोप त्यांना मागे घ्यावा लागेल; अन्यथा ही मतदानवाढ नाकारावी लागेल.

शिवसेनेला फटका
या वेळी राष्ट्रवादीच्या मतदानात जेवढी वाढ झाली तेवढाच फटका शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेला विधानसभेच्या वेळी एक लाख ५९ हजार ४४२ मते (२३ टक्के) मिळाली होती. या वेळी त्यांना एक लाख २९ हजार १०० मते मिळाली. ही मते १६ टक्के आहेत. शिवसेनेची सात टक्के मते खेचून घेण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. मतांच्या या टक्केवारीत काँग्रेस मात्र नेस्तनाबूत झाली आहे. विधानसभेच्या वेळी काँग्रेसला ५ टक्के मते होती. या वेळी मात्र अवघी ३ टक्के इतकी सुमार कामगिरी झाली आहे. 

राजकीय पक्ष व त्यांना 
मिळालेली टक्केवारी पुढीलप्रमाणे

भाजप    ३७ टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस    २८ टक्के
शिवसेना    १६ टक्के
काँग्रेस    ०३ टक्के
मनसे    १.३८ टक्के
रिपाइं (ए)    ०.०१ टक्के
एआयएमआयएम    ०.६० टक्के

Web Title: NCP accepted the alleged defective evm machine