राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची जोरदार तयारी

ncp_logo
ncp_logo

टाकवे बुद्रुक - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात फुकारलेल्या एल्गारचे रणशिंग ११ एप्रिलला मावळ तालुक्यात 'हल्लाबोल'च्या निमित्ताने दिसणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातून किमान २० हजार कार्यकर्ते आणि मतदार या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यासाठी रात्रंदिवस राबत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. युवक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सहकार, सेवादल अशा वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते गावागावात जाऊन या हल्लाबोलमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंदवहीत नावे नोंदवून घेत आहे. एका गावातून, गल्लीतून, आळीतून, मोठ्या गावातील वॉर्डात तर शहरातील प्रभागातील किती कार्यकर्ते, मतदार बाहेर पडणार याची चाचपणी सुरू आहे.

यासाठी विभाग निहाय बैठकांची पहिली फेरी पूर्ण झाली आहे, निवडक कार्यकर्त्यांच्या टीमने यात पुढाकार घेतला असून, ही कार्यकर्त्यांची फळी या नियोजनात सक्रीय झाली आहे. दीड हजार पेक्षा अधिक दुचाकी वाहनांची रॅली सोमाटणे वरून सभे स्थळी, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लवाजम्यासह दाखल होईल, असे नियोजन सुरू आहे. राष्ट्रवादीचे विधी मंडळाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सह राष्ट्रवादीचे अनेक नेते केंद्र सरकारवर कडकडाट करणार आहे. 

आंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळाची हक्काची बाजारपेठ असलेल्या कामशेतच्या शिवाजी चौकात ११ एप्रिलला सकाळी १० वाजता हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या अपयशाची कारण मीमांसा मांडणार आहेत. 

आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे म्हणाले, "नोटाबंदीचा परिणाम, शेतकरी कर्जमाफी, इंधनाचे वाढते भाव, महागाई, बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला बाजारभाव, हमीभाव या ना अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून भाजप सरकारचा नाकर्तेपणा जनते समोर आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करणार आहे.

आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर मालपोटे म्हणाले,"हल्लाबोल मोर्चासाठी आंदर मावळातून युवक विद्यार्थी संघटनेचे पाचशे कार्यकर्ते दुचाकी रॅलीत सहभागी होतील. तरूणांचा उत्साह पहायला मिळेल. 

हल्लाबोलची सभा भव्य प्रमाणात घेऊन राष्ट्रवादी आपली ताकद किंवा शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com