नव्या राजकीय समीकरणांमुळे उत्सुकता

नव्या राजकीय समीकरणांमुळे उत्सुकता

तीन विद्यमान आणि एक माजी नगरसेवक या प्रभागात रिंगणात उतरले आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू आणि विद्यमान नगरसेवक योगेश मुळीक रिंगणात असल्याने या प्रभागातील ही लढत चर्चेची ठरेल. मागील निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांचे प्रत्येकी एक नगरसेवक या भागातून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते बदलल्याने मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

महिला मागास वर्ग, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारणचे दोन गट असे एकूण चार गट या प्रभागात आहेत. मुळा-मुठा नदीचा काठ एका बाजूला असलेल्या या प्रभागात वडगाव शेरी, रामवाडी, गावठाणाचा भाग, आनंद पार्क, कल्याणीनगर-आगाखान पॅलेस हा उच्चभ्रू आणि सोसायट्यांचा परिसर समाविष्ट आहे. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक १८ आणि १९ यांना जोडून हा प्रभाग तयार केला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील काही भाग हा प्रभाग क्रमांक ४ ला जोडला गेला; तर कल्याणीनगरचा काही भाग या प्रभागाला जोडला आहे. काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सुनीता गलांडे या वेळी भाजपकडून उमेदवारी मिळवीत महिला मागास या वर्गातून लढत आहेत. सर्वसाधारण ‘क’ गटातून योगेश मुळीक, सर्व साधारण ‘ड’ गटातून सचिन भगत हे विद्यमान नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहे. याच भागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुमन पठारे या प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढत आहे. त्यामुळे या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक ताकद लावावी लागेल यात शंका नाही. 

मुळीक, भगत आणि गलांडे हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या भागाचा या प्रभागात समावेश असल्याने त्यांच्या लोकसंपर्काचा त्यांना फायदा होऊ शकतो.  आमदार मुळीक यांचे बंधूच रिंगणात असल्याने त्यांच्या दृष्टीने ही लढत प्रतिष्ठेची असेल. मागील निवडणुकीत त्यांना कडवी लढत देणारे शिवसेनेचे नितीन भुजबळ यांनी पुन्हा आव्हान उभे केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत असून, शिवसेना आणि भाजपचे उमेदवार चारही गटांत एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहिले आहेत. गलांडे आणि देवकर हे या भागातील मूळचे गावकरी म्हणून ओळखले जातात. चारही गटांत गलांडे आडनावाचा एकतरी उमेदवार आहेच. 

त्यामुळे भावकी येथे महत्त्वाची ठरू शकते. शिवसेनेचे भगत यांनी या भागातून निवडून येण्याची ‘हॅटट्रिक’ केली आहे. त्याचा फायदा त्यांच्या पॅनेलमधील उमेदवारांना झाला तर निश्‍चितच चित्र बदलू शकते. महिला सर्वसाधारण (ब) हा गट वगळता इतर गटांत अनुभवी उमेदवार असल्याने ‘ब’ गटातील लढतही चुरशीची होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com