बारामतीत शेतीतील नवी क्रांती- कृषिमंत्री फुंडकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

बारामती : "परदेशी संस्थांच्या करारातून बारामतीत शेतीच्या विकासासाठी होत असलेले काम महाराष्ट्राच्या शेतीतील नवी क्रांती आहे. मला येथे आल्यानंतर जणू परदेशातच आहोत, असा भास झाला,'' अशा शब्दांत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथील कृषिक प्रदर्शनाचे कौतुक केले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही, ""महाराष्ट्रात मी पाहिलेले आगळेवेगळे कृषी प्रदर्शन व शेती आणि शेतकऱ्यांच्या शाश्‍वत विकासासाठी केलेली धडपड आहे,'' अशा शब्दात कौतुक केले.

बारामती येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शारदानगर येथे आयोजित केलेल्या चार दिवसीय कृषी प्रदर्शनास आजपासून सुरवात झाली. आज सकाळी मराठमोळ्या वातावरणात या प्रदर्शनाचे उद्‌घाटन नेदरलॅण्डच्या व्हॅन हॉल लारेन्स्टाइन विद्यापीठाचे कुलगुरू हॅरी ओनकेन व नेदरलॅण्डच्या दूतावासातील कृषी सल्लागार डॉ. वावटर हॅरी यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषिमंत्री फुंडकर व राज्यमंत्री खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, बारामती ऍग्रोचे सीईओ रोहित पवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली, ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, विष्णुपंत हिंगणे, डॉ. अविनाश बारवकर, संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या औपचारिक उद्‌घाटनानंतर त्यांनी 110 एकरांतील शेतीच्या विविध प्रात्यक्षिकांचे, मधमाशीपालन प्रकल्प, मत्स्य प्रकल्प, पशुपक्षी प्रदर्शन, यांत्रिकी कक्ष, तसेच भीमथडी जत्रेची पाहणी केली. या वेळी केलेल्या पाहणीनंतर फुंडकर व खोत यांनी हे मत व्यक्त केले.
फुंडकर म्हणाले, ""कृषी क्षेत्रातील हे आगळेवेगळे प्रदर्शन आहे. येथे थेट बांधावर संबंधित बियाणे, औषधे, वाण लागवडीच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. महाराष्ट्रातील इतर केव्हीके आणि कृषी विद्यापीठांनी येथे चाललेल्या कामाचा आदर्श घ्यावा, असे हे काम आहे. सध्याच्या स्थितीत अधिक उत्पादन, उत्पादन खर्च कमी व गुणवत्ता असलेल्या पीक पद्धतींची आवश्‍यकता आहे, ते काम बारामतीत ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट करते आहे, याचे कौतुक आहे.''
खोत यांनीही, ""हे आगळेवेगळे प्रदर्शन शेतीला शाश्वत दिशेकडे नेणारे आहे, ट्रस्टचे एकूणच कामकाज हे महाराष्ट्राच्या शेतीला, शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीकडे नेणारे आहे. एकीकडे आज हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्या आहेत, या समस्यांना उपाय शोधण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे,'' असे मत व्यक्त केले.

मधमाशांपासून वांगी, काकडीपर्यंत!
या प्रदर्शनाच्या पाहणीदरम्यान मंत्री फुंडकर व खोत हे शेतीची प्रात्यक्षिके, मधमाशीपालन, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, माती परीक्षण व जैविक खत प्रयोगशाळा, तसेच मत्स्य शेती प्रकल्पामध्ये अधिक काळ रंगले. मधमाशी पालन प्रकल्पात येथे राणी माशी उत्पादित केली जाते, हे ऐकून फुंडकर प्रभावित झाले, तर मत्स्य शेतीसंदर्भात खोत यांनी अधिक खोलवर प्रश्‍न विचारून माहिती घेतली. नेदरलॅण्ड, थायलंड, इस्रायली पद्धतीने उत्पादन केलेल्या भाजीपाल्याची पाहणी करून त्याविषयी त्यांनी अधिक जाणून घेतले.

पुणे

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM

तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे...

04.48 AM

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM