नव्या यंत्रणेमुळे वाहतुकीचे चित्र बदलेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईला वेग आणला जाणार आहे. त्यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून, येत्या दहा-बारा दिवसांत शहरातील वाहतुकीचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्‍वास वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍त कल्पना बारवकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, वाहतुकीच्या वर्दळीच्या कालावधीत पोलिसांनी दंडात्मक कारवाईऐवजी वाहतूक नियमनावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

बारवकर यांनी गुरुवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी शहरातील वाहतूक सुधारण्याबाबत विविध मुद्यांवर संपादकीय विभागाशी मनमोकळेपणे संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘शहरात प्रत्येक कुटुंबात दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर दररोज सुमारे ३२ लाख दुचाकी वाहने धावत असतात. त्यात अरुंद रस्ते आणि सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुरेशी नाही. पीएमपी बस रस्त्यावर अचानक बंद पडतात.

नो पार्किंगमध्ये दुचाकी लावल्या जातात. त्यामुळे चौकांमध्ये आणि रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. ती दूर करण्यासाठी त्या ठिकाणी क्रेन्स आणि दुचाकी, पिकअप व्हॅन लवकर पोचेल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.’’

नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्या आणि नो एंट्रीतून येणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही विशिष्ट ठिकाणीच पी१, पी२ चे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे इतर ठिकाणीही अचानक कारवाई करण्यात येईल. 

सीसीटीव्हीद्वारे निरीक्षण करून नियम मोडणाऱ्या चालकांना अंतरदेशीय पत्र पाठवून कारवाई करण्यात येत आहे; परंतु या प्रक्रियेला गती देण्यासाठी लवकरच वेगळी सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही कक्षातील कर्मचारी वाढविण्यात येतील. सीसीटीव्हीद्वारे प्रभावी कारवाई करण्यावर भर दिला जाईल. बंद सिग्नल्स, त्यांचे सिंक्रोनायझेशन, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे स्पष्ट करणे आणि चौकातील कोंडी दूर करण्याबाबत वाहतूक शाखेकडून प्रयत्न सुरू असल्याचे बारवकर यांनी नमूद केले. 

वाहतूक पोलिसांकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतानाही त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते; परंतु आपण शहर वाहतूक पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू.

- कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा

वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष
वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना चौकांमध्ये आणि रस्त्यांवर प्रदूषित वातावरणात कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दमा, रक्‍तदाब आणि हृदयरोगाचे आजार होण्याची शक्‍यता असते. तरीही पोलिसांना बऱ्याचदा टीकेचे धनी व्हावे लागते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत खबरदारी घेणार, असे बारवकर यांनी सांगितले.