नवे वर्ष, देशभक्तीचा जागर

नवे वर्ष, देशभक्तीचा जागर
नवे वर्ष, देशभक्तीचा जागर

पुणे - नव्या वर्षाचा उत्साह, तिळगूळ वाटून परस्परांतील स्नेहभाव वृद्धिंगत करणारा मकर संक्रातीसारखा सण आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारा देशभक्तीचा जागर ही जानेवारी महिन्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. देशातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशसह उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकाही याच महिन्यात आहेत. अभिनेता शाहरूख खानच्या बहुचर्चित ‘रईस’सह हृतिक रोशनचा ‘काबिल’, तसेच ‘द सायलेन्स’ व ‘छत्रपती शिवाजी’ हे मराठी चित्रपटही नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात प्रदर्शित होत आहेत.

महिन्याच्या सुरवातीला (ता. १) कडू-गोड आठवणींनी भरलेल्या सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत केले जाईल. डिप्रेस्ड क्‍लास मिशन या संस्थेच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचविणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी दोन तारखेला स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक सावित्रीबाई फुले यांची १८६वी जयंती ३ तारखेला असून, हा दिवस महिला मुक्तिदिन म्हणूनही साजरा होतो. शीख धर्मीयांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंग यांची जयंती ५ तारखेला आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

शाकंभरीदेवी नवरात्रोत्सवासही याच दिवशी सुरवात होत आहे. तरुणाईचा लाडका ‘रोझ डे’ ७ तारखेला असून, ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांची ४४ वी पुण्यतिथी ८ तारखेला, तर प्रवासी भारतीय दिनही याच दिवशी आहे. घरकामगारांना सन्मानाने वागविण्याचा संदेश जागतिक घरकामगार दिनादिवशी (ता. ९) दिला जाईल. देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी ११ तारखेला आहे. जगभरात भारतीय संस्कृती व हिंदू धर्माची पताका फडकावत ठेवणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची १५४वी जयंती १२ला आहे. देशातील तरुणाईवर अतूट श्रद्धा ठेवणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणूनही साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राजाला जन्म देणाऱ्या राजमाता जिजाबाईंची जयंतीही (तारखेप्रमाणे) याच दिवशी आहे. शाकंभरीदेवी नवरात्र समाप्ती आणि गुरुपृष्यामृतही याच दिवशी आहे.

भोगी १३ जानेवारीला असून, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आहे. भारतीय संस्कृतीतील सण परस्परांतील स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश देतात. संक्रांतीदिवशीही परस्परांना तिळगूळ देऊन हा स्नेहभाव जोपासला जाईल. देशवासीयांना ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूँगा’ असे आवाहन करत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२०वी जयंती २३ तारखेला आहे. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन आणि शारीरिक शिक्षण दिन आहेत. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. राष्ट्रीय मतदार दिन २५ तारखेला असून, लोकशाहीच्या या राजाला त्याचे हक्क व कर्तव्याचे भान करून दिल जाईल. भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली आणि देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. देशाचा ६८व्या प्रजासत्ताक दिनी देशाप्रति असलेली जबाबदारी पार पाडण्याचा निश्‍चय प्रत्येकालाच करता येईल. आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनही याच दिवशी आहे. लाला लजपतराय यांची जयंती २८ तारखेला असून, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवला. त्यांच्या ६९व्या पुण्यतिथीदिनी (ता. ३०) या महात्म्याचे स्मरण होईल. हा दिवस हुतात्मा दिन आणि जागतिक कुष्ठरोग निवारण दिन म्हणूनही साजरा केला जातो. महिन्याच्या शेवटी (ता. ३१) गणेश जयंती असून, ती उत्साहात साजरी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com