एक लाखाची ऑनलाइन फसवणूक 'सकाळ'मुळे टळली

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मंचर (पुणे) : ऑनलाइन शॉपिंग करत असताना झालेल्या फसवणुकीची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे मंचर येथे बाजार समितीत कार्यरत असलेले अधिकारी अशोक राजापुरे यांची होणारी 1 लाख रुपयांची फसवणूक "सकाळ'च्या बातमीमुळे टळली आहे, असे राजापुरे यांनी सांगितले.

मंचर (पुणे) : ऑनलाइन शॉपिंग करत असताना झालेल्या फसवणुकीची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे मंचर येथे बाजार समितीत कार्यरत असलेले अधिकारी अशोक राजापुरे यांची होणारी 1 लाख रुपयांची फसवणूक "सकाळ'च्या बातमीमुळे टळली आहे, असे राजापुरे यांनी सांगितले.

राजापुरे त्यांच्याकडे बजाज फायनान्स कंपनीचे क्रेडिट कार्ड आहे. त्यांना 8406000774 या मोबाईल वरून फोन आला. "बजाज फायनान्स कंपनीतून बोलतो आहे. तुमचे क्रेडिट कार्डचे नूतनीकरण करायचे असून तुमच्या मोबाईल वर येणारा ओटीपी नंबर द्या.' असा फोन दिवसभरात 15 वेळा आला. वैतागून राजापुरे यांनी परत फोन आल्यानंतर ओटीपी क्रमांक दिला. शुक्रवारी (ता. 20) रोजी "सकाळ'मध्ये "कॅमेऱ्याऐवजी मिळाला साबण, ऑनलाइन शॉपिंगद्वारे 25 हजारांची फसवणूक' ही बातमी राजापुरे यांनी संध्याकाळी वाचली. त्या वेळी त्यांनी स्वतःच्या मोबाईलचे एसएमएस चेक केले. एक लाख 100 रुपयांची खरेदी क्रेडिट कार्ड वरून खरेदी झाल्याचे त्यांना एसएमएसद्वारे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. उशीर झाल्यामुळे शुक्रवारी नारायणगाव येथील बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय बंद झाले होते. शनिवारी (ता. 21) रोजी राजापुरे नारायणगाव येथील बजाज फायनान्स कार्यालयात चौकशीसाठी गेले. "तुमच्या नावावर क्रेडीट कार्डद्वारे दोन महागडे मोबाईल व कपडे आदी साहित्याची खरेदी झाली आहे. पण शनिवारी व रविवारी डिलेव्हरी बंद असल्यामुळे अजून मालाची डिलेव्हरी झाली नाही,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताबडतोब अधिकाऱ्यांनी डिलेव्हरी रद्द करून राजापुरे यांचे कार्ड बंद केले. त्यांनतर संबंधित मनोज या गुन्हेगाराला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन केला. त्या वेळी मनोजने उत्तर दिले. "बजाज फायनान्स कंपनीचा अधिकारी बोलतोय.' त्यानंतर कोणत्या शाखेला काम करीत आहात. अशी विचारणा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर मनोजने मोबाईलचे कार्ड बंद करून टाकले आहे. त्याचा फोन बंद आहे.

Web Title: One lakh online fraud cheated by Sakal