चालू एस.टी.मध्ये युवकाचा प्रवाशांसमोर कोयत्याने खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

राजगुरूनगर - अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याबद्दल मुलिच्या घरच्यांनी पोलिसांकडे एका मुलाविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रार दिलेल्या मुलाने या मुलिच्या १८ वर्ष वयाच्या भावाचा चालू एस.टी.मध्ये प्रवाशांसमोर कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना दावडी (पुणे) येथे आज सकाळी सव्वासात वाजता घडली. यामुळे एस.टीमध्ये चांगलीच खळबळ उडाली. तसेच प्रवाश्यांमध्येही घबराट पसरली. 

संशयित आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेऊन मृत युवकाच्या नातेवाईकांनी एसटीसह मृतदेह खेड पोलिस ठाण्यासमोर ठेवला असून, याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली आहे.  

श्रीनाथ सुदाम खेसे (वय १८, रा. खेसेवस्ती, दावडी, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो राजगुरूनगर येथे इयत्ता बारावीत शिकत होता. त्याच्या मोठ्या बहिणीचे फोटो आणि त्या फोटोसोबत अश्लील फोटो, संशयित अजित भगवान कान्हूरकर (रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे) याने सोशल मीडियावर व्हायरल केले. म्हणून मुलिच्या घरच्यांनी खेड पोलिस ठाण्यात ८ जून रोजी तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून या मुलिचा लहान भाऊ श्रीनाथचा, अजित याने आज सकाळी गोलेगाव-राजगुरूनगर एस.टी.बसमध्ये कोयत्याने सपासप वार करून खून केला. हे दोघेही आत्ते-मामे भावंड असल्याची माहिती समोर आली आहे.  

एस.टी.तील सहप्रवाशांच्या माहितीनुसार, गोलेगाववरुन आलेल्या एस.टी.मध्ये दावडी येथे श्रीनाथ तिकीट काढून बसला. संशयित त्यापूर्वीच आधीच्या गावावरूनच एस.टी.मध्ये मागच्या सीटवर बसून आलेला होता. थोडयाच वेळात तो मागून आला आणि मधल्या बाजूस बसलेल्या श्रीनाथवर मागच्या बाजूने थेट हल्ला करीत कोयत्याने वार केले. या प्रकाराने सहप्रवासीही हबकून गेले आणि कुणीही त्याला अडविण्याचे धाडस केले नाही. गोंधळ झाला म्हणून चालकाने एस.टी. थांबविताच संशयित दार उघडून पळून गेला.

त्यानंतर चालकाने एस. टी. तशीच खेड पोलिस ठाण्यात आणली. ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरल्याने नातेवाईक आणि गावकरी खेड पोलिस ठाण्यासमोर जमले. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही अशी भूमिका श्रीनाथच्या घरच्यांनी घेतली आहे. अश्लील फोटोप्रकरणी पोलिसांनी संशयितावर वेळीच कारवाई केली असती, तर ही घटना टळली असती. असा आक्षेप घेत दावडी बीटच्या पोलिसांनाही सह आरोपी करावे असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. 

Web Title: one murdered in st at rajgurunagar