सर्वांगीण विकासासाठी कठोर निर्णय घेणार - महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - ""शहरातील नियोजित प्रकल्प मार्गी लावतानाच सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्यांची सोडवणूक करण्यावर भर देणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार असून, त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील,'' असे नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सभागृहात सांगितले. 

पुणे - ""शहरातील नियोजित प्रकल्प मार्गी लावतानाच सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्यांची सोडवणूक करण्यावर भर देणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार असून, त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील,'' असे नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सभागृहात सांगितले. 

नवे उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी ""शहराचा परिपूर्ण विकास करण्यात रिपब्लिकन पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या 40 टक्के नागरिकांना पुरेशा सुविधांबरोबरच पक्के आणि कायमस्वरूपी घर कसे मिळेल, याला प्राधान्य देऊ,'' असे सांगितले. शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्याच्या निर्णयाला विरोधी बाकांवरील सदस्यांनी साथ द्यावी, असे आवाहन टिळक यांनी केले. शहरातील समस्या, सध्याची विकासकामे, भविष्यातील योजना, त्यांची अंमलबजावणी आणि त्याचा कालावधी मांडत विकासकामांची धडक मोहीम राबविण्याचे संकेतही त्यांनी दिले. 

टिळक म्हणाल्या, ""शहर स्मार्टसिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. त्यात, पुणेकरांना परवडणारी घरे, चांगल्या आरोग्यसेवा-सुविधा, वाहतूक धोरण आणि त्यांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्यावर भर राहणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. अशा योजना राबविताना नागरिकांचा सहभाग ठेवण्यात येईल, ज्यामुळे सर्वांगीण आणि नेमका विकास होण्यास मदत होईल. शहरात पर्यावरणविषयक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचा विचार आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात महिन्याकाठी कार्यक्रम घेता येईल. 

शहर विकासाच्या योजना राबविताना विरोधी पक्ष आणि प्रशासनाला विश्‍वात घेऊ.'' 

विकासकामांशी बांधिलकी 
उपमहापौर कांबळे म्हणाले, ""शहराचा परिपूर्ण विकास करण्याच्या प्रक्रियेत रिपब्लिकन पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सुमारे 40 टक्के नागरिक झोपडपट्ट्यांत राहत आहेत. त्यांना पुरेशा सुविधा पुरवितानाच त्यांना पक्के आणि कायमस्वरूपी घर कसे मिळेल, याला प्राधान्य असेल. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार नियोजन करून कामे करण्यात येतील.'' रिपब्लिकन पक्ष भाजपबरोबर असला, तरी पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसारच पक्षाची महापालिकेत भूमिका असेल. त्यानुसारच विकासकामे करण्यात येतील. रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकांवर पुणेकरांनी जो विश्‍वास टाकला आहे, त्यानुसार कामे करण्यात येतील. पक्षाची बांधिलकी विकासकामांशी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.