वारीतील पालखी सोहळ्याची ‘नांदी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

बाळासाहेब कोद्रे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

पुणे - ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’, ‘माउली, माउली’, असा जयघोष कानावर पडला की ओढ लागते ती ‘पंढरीच्या वारी’ची हो ना! खरं तर छायाचित्रकार बाळासाहेब कोद्रे यांनी गेल्या काही वर्षांपासून काढलेल्या पालखी सोहळ्याच्या छायाचित्रांचे ‘हा सुख सोहळा स्वर्गी नाही..’ या प्रदर्शनानेही हीच ओढ जागृत केली आहे. ही वारी सुरू होण्यास आणखी काही दिवस बाकी असले, तरीही या छायाचित्र प्रदर्शनाने पुण्यात मात्र पालखी सोहळ्याची नांदी झाल्याचे म्हणता येईल.

कोद्रे यांनी पालखी सोहळ्यादरम्यान काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. प्रदर्शनात कोद्रे यांनी १९९५ ते २०१६ या कालावधीत काढलेली जवळपास तीनशेहून अधिक छायाचित्रांचा समावेश आहे. डॉ. मोरे म्हणाले, ‘‘राज्यातील पालखी सोहळ्याची परंपरा ही आपल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीची साक्ष देणारी आहे. महाराष्ट्राचे दर्शन थोडक्‍यात करायचे असेल, तर तुम्ही ‘पंढरीची वारी’ ही करायलाच हवी.’’

‘‘पालखी सोहळा दरवर्षी असतो. मात्र, यात सहभागी होणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असते. अलीकडच्या काळात छायाचित्रकार, संस्कृतीचे अभ्यास, विविध कलांचे साधक यांचे लक्ष या पालखी सोहळ्याकडे लागून राहिलेले आहे. समाजात होणारे परिवर्तन आणि नव्या-नव्या गोष्टी समाजात कशा सामावल्या गेल्या, हे जाणून घेण्यासाठी इतिहास महत्त्वाचा असतो, असे मतही डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. हे प्रदर्शन येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १२) सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणारा पालखी सोहळा, पंढरीची वारी चित्रबद्ध व्हावी, या हेतूने मी कॅमेरा हातात घेऊन गेलो. वारीतील वेगवेगळे हावभाव कॅमेऱ्यात टिपता-टिपता मी कधी छायाचित्रकाराचा वारकरी झालो, हे कळालेच नाही. गेल्या वीस वर्षांपासून पालखी सोहळ्यात काढलेल्या छायाचित्रांतील काही छायाचित्रे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. समाजात प्रबोधन व्हावे, हा या छायाचित्र प्रदर्शनामागील उद्देश आहे.’’ 
- बाळासाहेब कोद्रे, छायाचित्रकार

Web Title: palkhi sohala photo exhibition