होसन्ना, होसन्ना, हे प्रभू येशू... आमचे रक्षण कर ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - होसन्ना... होसन्ना...! हे प्रभू येशू तू आमचे रक्षण कर ! असे म्हणत, प्रभू येशूचा जयजयकार करत ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांनी रविवारी (ता. 9) झावळ्यांचा रविवार अर्थातच पाम संडे साजरा केला. यानिमित्त हातामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन शांतता फेरी काढण्यात आली. तसेच, सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. 

पुणे - होसन्ना... होसन्ना...! हे प्रभू येशू तू आमचे रक्षण कर ! असे म्हणत, प्रभू येशूचा जयजयकार करत ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांनी रविवारी (ता. 9) झावळ्यांचा रविवार अर्थातच पाम संडे साजरा केला. यानिमित्त हातामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन शांतता फेरी काढण्यात आली. तसेच, सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. 

गुड फ्रायडेच्या अगोदरचा रविवार ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांमध्ये झावळ्यांचा रविवार म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. चाळीस दिवसांच्या उपवासाला त्यांच्यामध्ये विशेष महत्त्व असते. गुड फ्रायडेनंतर येणाऱ्या रविवारला ईस्टर संडे म्हणतात. येत्या शुक्रवारी (ता. 14) गुड फ्रायडे असून, पाम संडे ते ईस्टर संडे (ता. 16) येथपर्यंत पवित्र सप्ताहानिमित्त चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मीयांचे धार्मिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. 

शहरातील काही चर्चमध्ये रक्तदान शिबिरही घेण्यात आले. चर्चतर्फे काढण्यात आलेल्या शांतता फेरीत धर्मगुरूंसहित अबालवृद्ध सहभागी झाले होते. बिशप शरद गायकवाड यांनी चर्च ऑफ द होली नेम कॅथेड्रल (सी.एन.सी.) येथे झावळ्याच्या रविवारविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यहुदी धर्माखाली लोक कर्मकांड, धार्मिक रीतिरिवाज, अनिष्ठ प्रथांमध्ये त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत प्रभू येशूचे आगमन आनंददायक क्षणच होता, त्यामुळेच पाम संडे साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. 

हिंदुस्थानी मेथेडिस्ट चर्चचे फादर राजेंद्र पापानी म्हणाले, ""प्रभू येशूने जेरुसलेममध्ये गाढवाच्या शिंगरावर बसून प्रवेश केला. त्या वेळी आमच्यासाठी राजा आला, असे तेथील नागरिक गीत गाऊ लागले आणि त्यांनी प्रभू येशूचे खजुराच्या झाडाच्या झावळ्या पसरून स्वागत केले, तेव्हापासून झावळ्याचा रविवार साजरा करतात. मात्र, आपल्याकडे आता खजुराच्या झाडाच्या झावळ्यांऐवजी नारळाच्या झाडांच्या झावळ्यांचा वापर करण्यात येतो.'' 

चर्च ऑफ द होली नेम कॅथेड्रल (सी.एन.सी.)चे सहसचिव सुधीर चांदेकर म्हणाले, ""प्रभू येशूने जेरुसलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील जनसमुदायाने हातात खजुराच्या झावळ्या घेऊन होसान्ना, होसान्ना अशा घोषणा दिल्या. या दिवसापासून ख्रिस्ती समाजाचा पवित्र सप्ताह सुरू होतो. या आठवड्यात गुड फ्रायडे, मौदी गुरुवार, ईस्टर संडे, अंजिराचा सोमवार हे महत्त्वाचे दिवसही साजरे करण्यात येतात.'' 

शहर व उपनगरांतील विविध चर्चतर्फे झावळ्यांचा रविवारनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. रेव्हरंड अनिल इनामदार, अजित फरांदे, सुधीर गायकवाड, सुरेंद्र लोंढे, डॉ. पी. सी. भुजबळ, आर. एन. उदगीरकर यांनीही "पाम संडे'च्या मिरवणुकीत सहभाग घेतला. 

Web Title: Palm Sunday