"पार्टी विथ रेफरन्स' 

संभाजी पाटील 
गुरुवार, 5 जानेवारी 2017

या प्रमाणावर गटबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी, निवडणुकीच्या काळात होणारे "इनकमिंग' हे पक्ष वाढल्याचं लक्षण आहे. पुण्यात सध्या वाढणारा पक्ष कोणता हे मी सांगायची गरज नाही, "मित्रों...'! 

या प्रमाणावर गटबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी, निवडणुकीच्या काळात होणारे "इनकमिंग' हे पक्ष वाढल्याचं लक्षण आहे. पुण्यात सध्या वाढणारा पक्ष कोणता हे मी सांगायची गरज नाही, "मित्रों...'! 

मनातील खदखद, प्रेम, इच्छा, विरोध अशा कोणत्याही भावना व्यक्त करण्यास सध्या "सोशल मीडिया' हे प्रभावी माध्यम ठरले आहे. इच्छुकांना व्यक्त व्हायचे असेल, तर ते फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपचा आधार घेतायत. सध्या विविध पक्षांतील राजकीय हालचालींवर कार्यकर्ते, इच्छुकांसोबतच "नेटिझन्स'चेही बारीक लक्ष आहे. त्यामुळे त्या-त्या घटनांवर त्यांची मार्मिक टिप्पणीही सुरू असते. भाजपमध्ये बाहेरून येणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षाचे "निष्ठावान' कमालीचे नाराज आहेत म्हणे. त्यांची ही नाराजी आता लपून राहिलेली नाही. "भाऊ' आणि "नाना'च्या चढाओढीत पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. आजच आलेल्या एका "ब्रेकिंग न्यूज'नेही अशीच सकाळपासून सोशल मीडियावर धमाल केलीय . ""भक्‍तांची वाढती संख्या लक्षात घेता भाजपची निवडणूक आयोगाकडे विशेष मागणी चारच्या प्रभागात इतर पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध भाजपचे प्रत्येक गटात चार असे एकूण 16 उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी देण्यात यावी...'' आता बोला. पक्ष वाढल्याचेच हे लक्षण आहे की नाही? 

बरं आता केवळ एवढ्यावरच थांबले नाही. कोण हवा, कोण नको, हेही कोणत्याही नेत्याचा मुलाहिजा न बाळगता सांगण्याची हिंमतही कार्यकर्त्यांमध्ये आलीय. त्यामुळेच थेट विद्यमान नगरसेवकाने गेल्या पाच वर्षांत काय काय प्रताप केलेत याचे थेट व्हिडिओच कार्यकर्त्यांनी तयार करून ते थेट पक्षश्रेष्ठींना पाठवलेत म्हणे. तंत्रज्ञानातील बदलाचा कार्यकर्त्यांना काही तरी उपयोग व्हायला पाहिजे ना राव! असो. सध्या घराणेशाहीला विरोध करण्याचे बळ कार्यकर्त्यांमध्ये आले असून, त्याचा त्रास सध्या खासदारांना भोगावा लागत आहे. खासदारांच्या चिरंजीवांना आमदारकीचे तिकीट मिळता-मिळता राहिले. ते इतर इच्छुकांच्या विरोधाने, आता ते वडिलांच्याच जुन्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, इतर कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांप्रमाणेच तेही गेली पाच वर्षे काम करीत आहेत; पण प्रभागातील पक्षाच्या इतर इच्छुकांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारलेय म्हणे. "पार्टी विथ डिफरन्ट' असलेली पार्टी "पार्टी विथ रेफरन्स' कडे चालली आहे काय? असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच केलाय. डेक्कन परिसरात "व्हॉट्‌सऍप'वर हा "रेफरन्स' गोलगोल फिरतोय. या सगळ्या वातावरणात शिवसेनेच्या एका इच्छुकाचा हा मेसेज मला आठवतोय. ""मी तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवू शकेल का? हे मला माहीत नाही; पण तुमच्या प्रत्येक अडचणीत, मी तुम्हाला एकटे सोडणार नाही हे नक्की...'' भाजपच्या निष्ठावानांना असा शब्द मिळणार का? हे देवादी देव "देवेंद्र'च ठरवतील.