सायकलींवरून ‘गस्त’

सायकलींवरून  ‘गस्त’

‘स्ट्रीट क्राइम’ ही काही वर्षांपूर्वीपर्यंत सामान्य मलेशियन नागरिकांची मोठी डोकेदुखी होती. गुन्हेगारी घटवण्यासाठी मलेशिया सरकारने कम्युनिटी पोलिसिंगसह अनेक उपाय केले. यात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता पोलिस दलाला सक्षम करण्याचा. याबरोबरच लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. आपल्या भागातल्या गुन्हेगारीला आळा घालायचा असेल, तर त्याची जबाबदारी पोलिसांबरोबर त्या भागातल्या लोकांनीही काही प्रमाणात उचलायला हवी, यावर भर देत पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला.

क्वालालंपूर आणि सॅलॅंगोर पोलिसांबरोबर काम करणारे नागरिक आपापल्या भागात सायकलींवरून किंवा अगदी पायीपायीही चक्कर मारतात. कोणतीही अनुचित घटना तातडीने पोलिसांना कळवणे आणि शक्‍य तिथे गुन्हेगाराला रोखण्याचा प्रयत्न करणे, हे या ‘पोलिस मित्रां’चे मुख्य काम. ही गस्त सुरू झाल्यापासून या भागातल्या साखळीचोऱ्या आणि घरफोड्या कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर दातोश्री नजीब रझाक यांनी ‘वन मलेशिया’ आणि ‘बिग फास्ट रिझल्ट’ अशा दोन कल्पना मांडल्या. यातून ‘परफॉर्मन्स मॉनिटरिंग अँड डिलिव्हरी युनिट’ची (पेमांडू) रचना झाली. सरकारने सामान्य लोकांपासून तज्ज्ञांपर्यंत अनेकांशी संवाद साधला. त्यातून कम्युनिटी पोलिसिंगच्या प्रयोगाला बळ मिळाले. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचे अस्तित्व जाणवले तर लोकांना सुरक्षित वाटते, अशा गृहितकातून या प्रकल्पाला सुरवात झाली. पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करणाऱ्या सगळ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येते आणि त्यांना काही अधिकारही देण्यात आलेले आहेत.

पोलिस अधिकारी म्हणून तुम्हाला लोकांचे प्रश्‍न पूर्णपणे समजले आहेत का? याचे उत्तर तुमच्याकडे असणे आवश्‍यक आहे, असे या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या स्वयंसेवकांना वाटते. पोलिस आणि नागरिकांमध्ये परस्परविश्‍वास निर्माण करण्याला क्वालालंपूर पोलिसांनी भर दिला आहे. क्‍वालालंपूर पोलिसांच्यादृष्टीने नागरिकांच्या मनातली पोलिस दलाची प्रतिमा जपणे हा प्राधान्याचा विषय आहे. दहा लाखांहून जास्त मलेशियन नागरिकांनी गुन्हेगारीविरुद्धच्या या लढ्यात सहभाग नोंदवला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ‘हाऊ टू फाइट बॅक’ महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारी इंग्रजीसह स्थानिक भाषेतली पुस्तिका नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘युनायटेड अगेन्स्ट क्राइम’ या मोहिमेत महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. पोलिसांचा रस्त्यांवरचा वाढता वावर, सुरक्षित शहर, गुन्हे आणि गुन्हेगारीबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी ‘क्राइम अवेअरनेस डे’ आणि शाळांशी संपर्क, असे उपक्रम पोलिसांनी सुरू केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून देशभरातली गुन्ह्यांची संख्या गेल्या काही वर्षांत घटली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com