...तर प्रसंगी विरोधात बसू- लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येणारच आहे. जर बहुमत मिळाले नाही तर प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेची मदत घेणार नाही, असे सूचक वक्‍तव्य भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी येथे गुरुवारी (ता. १६) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी, गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीका केलेल्या भारती चव्हाण यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येणारच आहे. जर बहुमत मिळाले नाही तर प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेची मदत घेणार नाही, असे सूचक वक्‍तव्य भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी येथे गुरुवारी (ता. १६) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी, गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीका केलेल्या भारती चव्हाण यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवक कमी पडले तर आम्ही शिवसेनेची मदत घेऊ, असे वक्‍तव्य केले होते. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी आम्ही भाजपला कधीही पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले. याबाबत  जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. जर सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवक कमी पडले तर प्रसंगी आम्ही विरोधात बसू.’’ 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी शहराच्या दौऱ्यावर असताना भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका केली. याबाबत बोलताना जगताप म्हणाले, ‘‘भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर कोणी भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाही. यामुळेच पवार असे आरोप करीत आहेत.’’ विरोधकांच्या जाहीरनाम्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘गेल्या १५ वर्षांपासून विरोधक जाहीरनाम्यामध्ये तीच-तीच आश्‍वासने देत आहेत. त्यामध्ये नवीन असे काहीच नाही.  भाजपवर उमेदवार आयात केल्याचा आरोप विरोधक करतात. आयात म्हणजे आम्ही काही परदेशातून उमेदवार आणलेले नाहीत. सर्व उमेदवार शहरातीलच असून निवडून येण्याची क्षमता बघून उमेदवारी देण्यात आलेली आहे.’’

खासदार अमर साबळे, भाजपचे नेते वसंत वाणी, आझम पानसरे, बाबू नायर, उमा खापरे, प्रमोद निसाळ, रामकृष्ण राणे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना साबळे म्हणाले, ‘‘पवार यांचे ताळतंत्र सुटलेले आहे. त्यांची बुद्धी शाबूत राहो, अशी मी प्रार्थना करतो. तसेच भाजपमध्ये कधीही गटबाजी किंवा नाराजी नव्हती. आता सर्व जण प्रचाराला लागले आहेत.’’

आज होणार भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन
‘सकाळ’च्या गुरुवारच्या अंकात ‘भाजपचा जाहीरनामा अद्याप गुलदस्तात’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत बोलताना शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘भाजपचा जाहीरनामा तयार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो सभेमध्ये प्रकाशित करण्यात येणार होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळऐवजी दुपारी सभेची वेळ दिली. मात्र उन्हामुळे दुपारी ती वेळ सभेसाठी योग्य नसल्याने आम्ही ती सभा रद्द केली. शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची शनिवारची सभा दुपारी दीड वाजता पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मैदानात होणार आहे.’’