प्राप्तिकरात पिंपरी-चिंचवड शहरात पाचशे कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

आर्थिक वर्षांत पिंपरी-चिंचवडमधून तीन हजार ३०० कोटींचा कर जमा
पिंपरी - केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचा चांगला फायदा प्राप्तिकर खात्याला झाला असून, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवडमधून प्राप्तिकर खात्याच्या तिजोरीत तीन हजार ३०० कोटींची रक्‍कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षी दोन हजार ८०० कोटी रुपयांचा कर प्राप्तिकर खात्याकडे जमा झाला होता. यंदा ही रक्‍कम तीन हजार कोटी रुपयांच्या पुढे जाऊन पोचली आहे. कराची रक्‍कम वाढत असताना दुसरीकडे नवीन करदात्यांच्या संख्येत १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यात व्यावसायिक आणि उद्योजकांची संख्या मोठी आहे.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये काळा पैसा जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘इन्कम डिक्‍लरेशन स्कीम’ जाहीर केली होती. त्या वेळी अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. 

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न करणाऱ्यांनी या वेळी विवरणपत्र भरले होते. नोटाबंदी झाल्यानंतर आतापर्यंत प्राप्तिकर खात्याकडे विवरण पत्र न भरणाऱ्या अनेकांनी ते दाखल केले. त्यामुळे कराची रक्‍कम आणि नवीन करदात्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून जमा झालेल्या तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या रकमेत व्यक्‍तिगत मंडळींची संख्या अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. 

उद्दिष्टांची पूर्तता 
प्राप्तिकर खात्याने पिंपरी-चिंचवडसाठी तीन हजार ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते, ते पूर्ण झाले आहे. प्राप्तिकर खात्याने गेल्या वर्षी राबवलेल्या काही योजनांमुळे ते पूर्ण करणे शक्‍य झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पुणे विभागात ४२ हजार कोटी जमा 
प्राप्तिकर खात्याच्या पुणे विभागाला २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ४२ हजार २०० कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात ३६ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला होता. या वर्षी त्यात १८ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. प्राप्तिकराच्या रकमेत वाढ होत असताना याठिकाणी नवीन करदातेदेखील वाढले आहेत.