अतिक्रमणांच्या चक्रात पिंपरी चौक

अतिक्रमणांच्या चक्रात पिंपरी चौक

अनधिकृत पथारीवाले, बेकायदेशीर पार्किंग, खासगी वाहन थांबे, कचरा, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे अशा विविध समस्यांच्या विळख्यामध्ये शहरातील बहुतांश चौक अडकले आहेत. दिवसेंदिवस या समस्येत भरच पडत असून, नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन या प्रश्‍नांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये विशेषत: वाहनधारकांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. त्याचे सचित्र वर्णन करणारी मालिका आजपासून... 

पिंपरी - विविध प्रकारच्या मशिनरी अन्‌ ऑटोमोबाईलच्या दुकानांनी पदपथांवर केलेले अतिक्रमण, खासगी वाहन व रिक्षांचे अनधिकृत पार्किंग, रस्त्यावर हॉटेलच्या साहित्यामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. पोलिस आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराचा केंद्रबिंदू असलेला पिंपरी चौक वाहतूक कोंडी अन्‌ अतिक्रमणाच्या दुष्टचक्रात सापडला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाची ओळख आहे. पुणे, निगडी, काळेवाडी, नेहरूनगर या परिसराला जोडणारा महत्त्वाचा चौक कायमच रहदारीने गजबजलेल्या असून चहूबाजूने अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने ग्रासला आहे. नेहरूनगरकडे जाणाऱ्या मार्गाला चहूबाजूने हातगाड्या, सहाआसनी व तीनआसनी रिक्षांनी अर्धा रस्ता व्यापल्याने रोज वाहतूक कोंडी होते. 

बेकायदा पार्किंग
रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने आणि रिक्षा बेशिस्तीने लावतात. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते निगडीमार्गे व काळेवाडी ते नेहरूनगरमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या शेअर-ए रिक्षांनी बेकायदा पार्किंग केले आहे. या रिक्षा रस्त्यात थांबवून प्रवाशांना उतरविले जाते. वस्तूत: महामार्गांवरील चौकात कोणतेही खासगी वाहन उभे करण्यास किंवा प्रवाशांना उतरविण्यास मनाई केली पाहिजे. 

पदपथ गायब
पिंपरीतून शगून चौकाकडे जाणाऱ्या मार्गाची बिकट अवस्था झाली आहे. या चौकात पिंपरी मार्केट व काळेवाडीकडे मुख्य रस्ते एकत्र येतात. या चौकातील मोठ्या दुकानदारांनी पदपथांना गायब करत चहूबाजूंनी अतिक्रमित केले आहे. रस्त्यावर वाढीव बांधकामे करून मोठ्या मशिनरीजचे दुकान मांडून अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यांची वाहने रस्त्यातच थांबविल्याने चौकात ट्रॅफिक जाम होते. परिणामी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. रस्त्यात पीएमपीचा बसथांबा असल्याने पिंपरीगावमार्गे जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये नीट चढ-उतारदेखील करता येत नाही. 

हॉटेल्समुळे रस्ते बनले गटारी
या चौकातील हॉटेल्सने बऱ्यापैकी रस्त्यावर दुकान थाटल्याने वारंवार चौकात वाहतुकीचा खोळंबा होतो. हॉटेलचा पसारा रस्त्यापर्यंत येऊन ठेपल्याने रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. हॉटेल्समधील सांडपाणी फेकण्यासाठी रस्ता खोदून गटारी केल्याने आरोग्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. चौकातील बिअर शॉपी व ताडी दुकानांमुळे सायंकाळी मद्यपींचा महिलांना त्रास होतो.

या परिसराची अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात येईल. पाहणी केल्यावर लवकरच पथक पाठवून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येईल.
- अण्णा बोदडे, सहायक आयुक्त महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com