शहरात आचारसंहितेची एेशीतैशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पिंपरी - निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख घोषित केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, चोवीस तासांनंतरही शहरात ठिकठिकाणी इच्छुकांचे प्रचार फलक कायम असल्याचे दिसून आले असून, आचारसंहितेची एेशीतैशी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पिंपरी - निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख घोषित केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, चोवीस तासांनंतरही शहरात ठिकठिकाणी इच्छुकांचे प्रचार फलक कायम असल्याचे दिसून आले असून, आचारसंहितेची एेशीतैशी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिकेच्या सहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने फलक काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्य रस्त्यांवरील बहुतांश फलक काढण्यात आले असले तरी काही ठिकाणी राजकीय फलक अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. शहरात फेरफटका मारला असता लाइटच्या पोलवर; तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला इच्छुकांचे पक्षाच्या चिन्हासह फलक कायम असल्याचे दिसून आले. याशिवाय काही ठिकाणी मुख्य चौकांमध्ये विविध पक्षांनी लावलेले कायमस्वरूपी फलकही झाकून ठेवण्यात आलेले नाहीत. नगरसेवकांच्या नावाचे फलकही अद्याप तसेच आहेत. 

काही दिवसांपूर्वी शहरातील काही उमेदवारांनी प्रचाराकरिता सायकल रिक्षाचा वापर सुरू केला होता. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही रीतसर परवानगी न घेता या रिक्षांद्वारे गुरुवारीही प्रचार सुरू असल्याचे दिसून आले. याशिवाय महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या कोनशिलाही तशाच ठेवण्यात आल्या आहेत. काही उमेदवारांचा घरोघरी प्रचार सुरू आहे. या उमेदवारांकडून तिळगुळाचे पाकीट आणि इच्छुकाचे पत्रक यांचेही घरोघरी वाटप सुरू आहे. काही इच्छुकांनी मकर संक्रांतीचे निमित्त साधून हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

याबाबत पत्रकेही वाटली होती. मात्र, आता आचारसंहिता लागल्याने कार्यक्रम रद्द झाल्याची पत्रके वाटण्यास सुरवात झाली आहे.

भोसरीतील फलकांवर कारवाई - गव्हाणे
बुधवारी दुपारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर भोसरी परिसरात भाजपच्या वतीने रात्री फलक लावण्यात आले. गुरुवारी सकाळी हे फलक काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मनाई केली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याला फोन लावून दिला. मात्र, महापालिकेने त्या फलकांवर कारवाई केल्याचे भोसरीतील नगरसेवक अजित गव्हाणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.