प्रेमसंबंधास नकार दिल्याने महिलेवर कुऱ्हाडीने वार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पिंपरी - प्रेमसंबंधास नकार दिल्याने सुभाष नथू लांडगे (रा. कासारवाडी) याने एका 35 वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. 5) सकाळी साडेआठच्या सुमारास कासारवाडीतील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर घडली. याबाबत महिलेच्या पतीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगे हा महिलेच्या पतीचा मित्र असून, काही दिवसांपूर्वी ते शेजारी राहत होते. पीडित महिला भोसरी एमआयडीसीत एका कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ती कामाला जात असताना लांडगे याने उड्डाण पुलावर त्याची दुचाकी महिलेच्या दुचाकीला आडवी लावून  तिला थांबवले. तू मला आवडते असे म्हणून प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, महिलेने त्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या लांडगे याने जवळ आणलेल्या कुऱ्हाडीने तिच्यावर वार करून तो पळून गेला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महिलेला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून, या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश जगदाळे करत आहेत.