ग्रामीण मावळची अर्थवाहिनी ‘क्षीण’

ग्रामीण मावळची अर्थवाहिनी ‘क्षीण’

कामशेत - ब्रिटिश काळापासून लौकिक असणाऱ्या कामशेत बाजारपेठेत सध्या कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कचरा टाकण्यास पर्यायी जागा नसल्याने आठवड्याला भरणारा बाजारही रद्द करण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच आली आहे. यातून हजारो ग्राहकांची गैरसोय तर होणार आहेच. पण शेतकरी व विक्रेत्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. आठवडे बाजार ‘बंद’मुळे आंदर, पवन व नाणे मावळची जणू ‘अर्थवाहिनी’च क्षीण झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

शहराला वैभवशाली परंपरा
शहराला स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश काळाची पार्श्वभूमी आहे. ब्रिटिश सरकारच्या विरोधातील चळवळीतील कार्यकर्ते याच बाजारात एकत्र येत होते. व्यापाऱ्याचे पूर्वीपासून प्रमुख केंद्र म्हणून शहराची ओळख आहे.

आठवडे बाजाराची स्थापना
शहरात आठवडे बाजार सुरू व्हावा, यासाठी तत्कालीन सरपंच (कै.) दिलीप टाटिया, उपसरपंच अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर वाळूंज व अन्य सदस्यांनी प्रयत्न करून आठवडे बाजार सुरू केला. 

विकासात भर
आठवडे बाजारामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ खरेदीसाठी कामशेतमध्ये येतात. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्याचे साधन ही बाजारपेठ होऊ लागली. भाजीपाल्यासोबत किराणामालाचाही मोठा व्यापार येथे होऊ लागला. राज्यभरातून तांदूळ खरेदीसाठी अनेक आजही या बाजारपेठेत येतात. लाखो रुपयांची उलाढाल रोज होते. 

समस्येचे ग्रहण
शहरातील संपूर्ण कचरा जुन्या खामशेत येथील गायरानात टाकला जात होता. परंतु, त्या गायरानाची रीतसर परवानगी घेतली नव्हती; तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्टिफिकीटही घेतले नव्हते. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे खामशेतकर नागरिक त्रस्त झाले होते. त्यांनी हा कचरा डेपो बंद व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी, ग्रामपंचायतीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कचरा टाकण्यास बंदी केली. पर्यायी जागा नसल्याने आज शहरात १४ ते १५ टन कचरा जागोजागी  पडून आहे. 

आज जनजागृती फेरी
शहरातील कचऱ्याच्या समस्यांसाठी कामशेत लायन्स क्‍लब, व्यापारी असोसिएशन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ज्येष्ठ नागरिकांची बैठक झाली. कचरा डेपोचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याने तो सुटायला वेळ लागेल. तोपर्यंत शहरातील नागरिकांत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे  मंगळवारी (ता. १२) आयोजन 
केले आहे. प्लॅस्टिक कचरा आटोक्‍यात आणणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे, कमीतकमी कचरा होईल, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आदीसंदर्भात ही रॅली  निघणार आहे.

अधिवेशनासाठी मी नागपूरला आहे. येत्या चार-पाच दिवसांत कामशेत शहरातील कचराप्रश्‍नी बैठक घेऊन डेपोचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन.
- बाळा भेगडे, आमदार

शहरात जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी कुणीही जागा देत नाही. कचरा डेपो बंद झाल्याने तसेच पर्यायी जागा नसल्याने कचराही उचलणे बंद केले आहे. कचरा डेपोबाबत न्यायालयात १९ डिसेंबरला सुनावणी आहे. आम्ही सर्व कागदपत्रेही सादर केली आहेत. आठवडे बाजारामुळे पुन्हा कचरा साचेल म्हणून आम्ही बाजार रद्द केला आहे.
- सारिका शिंदे, सरपंच, -काशिनाथ येवले, उपसरपंच

कचरा डेपो बंद झाल्याने शहरात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. शहर प्लॅस्टिकमुक्त होऊन स्वच्छता राहिली पाहिजे. हा प्रश्‍न न्यायालयीन असल्याने तो सुटेपर्यंत नागरिकांनी दक्षता पाळावी, यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे. 
- सुभाष जाधव, अध्यक्ष, लायन्स क्‍लब

आठवडे बाजार बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होते व ग्राहकांनाही फटका बसतो. कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. जोपर्यंत कचरा डेपोचा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत सर्वांनी कचरा कमीत कमी करावा.
- विलास भटेवरा, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन

धोका प्रदूषणाचा
प्लॅस्टिक, धातू, कागद, पुठ्ठे, काचेच्या वस्तूंचा कोरड्या कचऱ्यात समावेश होतो. तसेच भाज्यांचे देठ, खरकटे अन्न, पालापाचोळा अशांना ओला कचरा म्हटले जाते. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यातून पाण्याचे स्रोत दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे कचरा तातडीने उचलला पाहिजे.

कचऱ्याचे दुष्परिणाम
  उंदीर, घुशींचा सुळसुळाट होतो
 साथीचे रोग पसरण्याची शक्‍यता
 माश्‍या आणि इतर कीटकांची संख्या वाढून आजार वाढतो
 कचऱ्यामुळे दूषित झालेल्या पाण्यातून अंगावर पुरळ येते
 श्‍वसन मार्गाचा जंतूसंसर्ग 
  पचन संस्थेचे विकार वाढतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com